फडणवीसांनी पाठवलं नव्हतं, अनिल देशमुखांनीच बोलावलं होतं; ईडी प्रकरणात 'निरोप्या'चा आरोप असलेले समित कदम काय म्हणाले?
Anil Deshmukh : समित कदम हे जनसुराज्य पक्षाचे युवा अध्यक्ष असून त्यांच्याच मार्फत देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला उद्धव ठाकरे, अजित पवारांवर आरोप करण्यास सांगितले होते असा दावा अनिल देशमुखांनी केला होता.
सांगली : देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांना सांगून आपल्यासमोरील अडचणींमध्ये काही मदत होते का अशी विनंती त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली होती असा आरोप समित कदम यांनी केला. मी स्वतःहून अनिल देशमुख (Devendra Fadnavis) यांना भेटायला गेलो नव्हतो तर देशमुखांनीच मला भेटायला बोलावलं होतं, त्यामध्ये फडणवीसांचा संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. समित कदम हे मिरजेतील जनसुराज्य शक्ती युवा अध्यक्ष असून त्यांच्या नावाचा उल्लेख अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना केला होता. त्यावर समित कदम यांनी स्पष्टीकरण दिलं.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आरोप करा, मग आम्ही तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून मुक्त करू असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव आणला होता असा आरोप तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांनी केला होता. देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी मित्रपक्षाचे पदाधिकारी असलेल्या समित कदम यांना पाठवल्याचंही देशमुखांनी सांगितलं होतं.
ईडीच्या अडचणी कमी करण्यासाठी विनंती
अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना समित कदम म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपल्या अडचणी कमी करता येतात का पाहा अशी विनंती आपल्याला अनिल देशमुखांनी केली होती. देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून आपण देशमुखांची भेट घेतली नव्हती. उलट देशमुखांनी बोलावल्यानंतर आपण त्यांची भेट घेतली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी पाठवलेला माणूस सांगली जिल्ह्यातील मिरजेतील एनडीएच्या मित्रपक्षाचा पदाधिकारी होता असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष समित कदम हे त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आणि कार्यालयात आले आणि त्यांनी फडणवीस यांना बोलायचे आहे असे देशमुख यांनी सांगितले होते असा दावा केला होता.
काय आरोप केलेला अनिल देखमुखांनी?
अनिल देशमुख-फडणवीस वादात देशमुखांनी नवा गौप्यस्फोट केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेल्या निरोप्याचे नाव समित कदम असल्याची माहिती अनिल देशमुखांनी दिली. उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्याविरोधात आरोप करणारे अॅफिडेव्हिट द्यावे असा निरोप फडणवीसांनी दिला होता असं देशमुखांनी सांगितलं.
समित कदम आपल्याकडे यासंदर्भात पाच ते सहा वेळा आला असल्याचा दावा देशमुखांनी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप काय करायचे त्याचा लिफाफा समितने दिल्याचं देशमुखांनी सांगितलं. समितसोबतच्या संवादाची व्हिडीओ क्लिपसुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा अनिल देशमुखांनी केला. पण 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपात काही तथ्य नसल्याचं आपण समित कदमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना कळवलं आणि नेत्यांविरोधात आरोप करणार नसल्याचं सांगितलं असं देशमुख म्हणाले.
फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे आपण आरोप न केल्याने दुसऱ्या दिवशी आपल्यावर ईडीने छापेमारी केली आणि खोट्या गुन्ह्यात गुंतवलं. या प्रकरणात आपल्याला 13 महिने तुरुंगात राहावं लागल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलं.
ही बातमी वाचा:
- Devendra Fadnavis : माझ्या नादी लागला तर मी सोडत नाही, देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना थेट इशारा