Santosh Deshmukh : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशीच्या खुनाच्या निषेधार्थ सांगलीत आक्रोश मोर्चा
मोर्चाच्या आयोजनासाठी मराठा समाजाची व्यापक बैठक मराठा समाज भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सांगलीमध्ये 23 जानेवारीस आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या व परभणीमधील पोलिस कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या निषेधार्थ सांगलीत 23 जानेवारीला आक्रोश मोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या आयोजनासाठी मराठा समाजाची व्यापक बैठक मराठा समाज भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सांगलीमध्ये 23 जानेवारीस आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या आक्रोश मोर्चास संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख कुटुंबीय, खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर मोर्चास संबोधित करणार आहेत.
या आक्रोश मोर्च्याच्या नियोजिनासाठी 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वा मराठा समाज येथे सर्व बहुजन समाजातील बांधवानी उपस्तिथ राहावे असे आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. या बैठकीला विलास देसाई, संजय पाटील, अभिजित पाटील, दिग्विजय पाटील, तानाजी चव्हाण, विजय धुमाळ, तानाजी भोसले, दादासाहेब पाटील मच्छिंद्र बाबर, संभाजी पाटील, विकास मोहिते, प्रदीप कर्वेकर, अॅड. उत्तमराव निकम, अशोकराव पाटील, अरुण गवंडी, स्वप्नील देशमुख, अशोक शिंदे, धनंजय हलकर, ऋषिकेश खराडे, संतोष भोसले तसेच मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणात मोठे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष होता, तर या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवला जात असल्याचा वाल्मिक कराडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी जवळचे संबंध आहेत, त्यामुळे आता पक्षाकडून मोठा निर्णय घेण्याच आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कार्यकारणी बरखास्त केल्यामुळे धनंजय मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता ही मोठी घडामोड घडली आहे. त्याचबरोबर यापुढे पक्षात केल्या जाणाऱ्या तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना देखील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडून देण्यात आल्याची माहिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या