Sangli News : राष्ट्रीय वेटलिफ्टर संकेत सरगरला सांगली जिल्हा परिषदेकडून 5 लाखांची मदत
राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या सांगलीच्या संकेत सरगरला सांगली (Sangli News) जिल्हा परिषदेकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
Sangli News : राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या सांगलीच्या संकेत सरगरला सांगली (Sangli News) जिल्हा परिषदेकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात वेटलिफ्टर संकेत सरगरच्या आई-वडिलांकडे पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
मूळचा आटपाडी तालुक्यातील तळेवाडी येथील संकेत महादेव सरगर हा सध्या सांगली शहरातील संजयनगर भागात राहतो. संकेतने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत केलेल्या कामगिरीनंतर अनेकांनी त्याला मदत देण्याचं घोषित केले होते. त्यानुसार सांगली जिल्हा परिषदेकडून संकेतचा पाच लाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सन 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये संकेतने रौप्यपदक पटकावून जिल्ह्याचे नाव उंचावले होते. तसेच देशाच्या लौकिकातही मोलाची कामगिरी केली होती.
अजूनही शासकीय नोकरीची प्रतीक्षा
भारताला रौप्यपदक मिळवून दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून तीस लाख रुपये देण्याचा जाहीर करण्यात आलं होतं, त्याचबरोबर संकेतला शासकीय नोकरीमध्ये देखील समावेश करण्याचा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. मात्र, अद्यापही राज्य सरकारकडून त्याला कोणतीच मदत मिळालेली नाही. मात्र, सांगली जिल्हा परिषदेकडून संकेतला पाच लाख रुपयांची मदत देऊ करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सांगलीचे पालकमंत्री व कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून संकेतला लवकरच शासकीय नोकरीत समावेश करून घेऊ, असे आश्वासन दिले.
248 किलो वजन उचलत संकेतने कॉमनवेल्थ स्पर्धेतलं भारताला पदक मिळवून दिलं होतं. इंग्लंडमध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंग विभागात भारताचे प्रतिनिधित्व करत 55 किलो गटात रौप्यपदक पटकावलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात संकेतची बहिण काजल सरगरचं कौतुक केलं होतं. त्यामुळे लहान बहिणीच्या पाठोपाठ मोठ्या भावाने देखील आई-वडिलांच्या कष्टाची चीज करून दाखवलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या