(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंढरपूरला जाणारी रेल्वे आटपाडीमार्गेच जाईल, दिल्लीत प्रयत्न ; विशाल पाटलांचा भरसभेत शब्द
आटपाडी बाजार समितीत आयोजित कार्यक्रमात खासदार विशाल पाटील बोलत होते. त्यावेळी, त्यांच्या रेल्वे आणि राजकीय विधानाची चांगलीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
सांगली : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. त्यामुळेच, पंढरपूर शहरांसोबत कनेक्टीव्हीटी सहज, सुलभ आणि गतीमान व्हावी, शासनासह लोकप्रतिनीधीही सातत्याने प्रयत्न करतात. तसेच, आपल्या मतदारसंघातून थेट पंढरपूरला रेल्वे कनेक्टीव्हीटी असावी, अशीही अनेकांची इच्छा असते. प्रवासी व भाविकांचाही त्यासाठी सातत्याने आग्रह असतो. आता, पहिल्यांदाच अपक्ष खासदार झालेल्या आणि काँग्रेसला पाठिंबा दिलेल्या विशाल पाटील यांनी पंढरपूरला जाणारी रेल्वे आटपाडी मार्गे पंढरीला जावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, पुढील काळात सांगली जिल्ह्यातील आटपाडीमार्गे पंढरपूरसाठी रेल्वेसेवा सुरू होऊ शकते.
आटपाडी बाजार समितीत आयोजित कार्यक्रमात खासदार विशाल पाटील बोलत होते. त्यावेळी, त्यांनी केलेल्या रेल्वेमार्ग आणि एका राजकीय विधानाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरला जाणारी रेल्वे ही आतापर्यंत दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या आटपाडीमधून जावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं विशाल पाटील यांनी म्हटलंय. तसेच, शिवसेना शिंदे गटाचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना विधानसभेसाठी ऑफर देत त्यांच्या पाठीशी ठामपणे उमे राहणार असल्याचे देखील पाटील यांनी स्पष्ट केले. रेल्वे आणि विधानसभेच्या अनुषंगाने खासदार विशाल पाटील यांचे वक्तव्य खानापूर आणि सांगली विधानसभा मतदारसंघात चर्चेचा मुद्दा बनले आहे. आटपाडीसाठी केंद्रातून वेगळे काहीतरी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंढरपूरला जाणारी रेल्वे आटपाडीमार्गे जाईल, यासाठी आपण प्रयत्न करत आहेत, असे विशाल पाटील यांनी म्हटले.
कराडे ते पंढरपूर नवीन रेल्वे
कराड ते पंढरपूर नव्याने रेल्वे सुरू करण्याची मागणी खासदार विशाल पाटील यांच्याकडून होत आहे. सांगली जिल्ह्यातून जाणारा हा मार्ग दुष्काळी भाग म्हणून परिचीत आहे. त्यामुळे, या मार्गावर रेल्वे धावल्यास कडेगाव, खानापूर आणि आटपाडी मार्गावर रेल्वेसेवा सुरू होईल आणि येथील नागरिकांना, शेतकरी व व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होईल.
विशाल पाटलांकडून थेट ऑफर
आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा खेळ सुरू होईल.या निवडणुकीत लाखोंने मते सुहास बाबर यांना मिळावीत, ही आमची अपेक्षा आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही शब्द सोडवून आलेलो आहे. जिथे आमच्यावर प्रेम आहे तेथे आम्ही प्रेम देतो. आम्ही ताकदीने तुमच्या पाठिशी ठाम राहणार आहोत, अशी ग्वाही देखील खासदार विशाल पाटील यांनी सुहास बाबर यांना दिली आहे. तुम्ही विधानसभेसाठी आमच्याकडून उभे रहावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण, आमचे मित्र खासदार श्रीकांत शिंदे ऐकायला तयार नाहीत, असे म्हणत विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांना पाठबळ देण्याचं आवाहन खानापूरकरांना विशाल पाटील यांनी केलं आहे.
हेही वाचा
जरांगेंकडं आता कोणी लक्ष देत नाही, नाशिकच्या रॅलीला केवळ 8 हजार लोकं; भुजबळांचं बोचरी टीका