Sangli Crime : सांगलीतील राष्ट्रवादीचा पदाधिकाऱ्याच्या खून प्रकरणातील 13 आरोपींवर मोक्काची कारवाई, काय आहे प्रकरण?
Sangli Crime : सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आणि बाबा ग्रुपचा अध्यक्ष नालसाब मुल्ला याच्या खून प्रकरणातील 13 संशयितांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्काअंतर्गत कारवाईला मंजुरी देण्यात आली आहे.
सांगली : सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आणि बाबा ग्रुपचा अध्यक्ष नालसाब मुल्ला (Nalsaab Mulla) याच्या खून प्रकरणातील 13 संशयितांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्काअंतर्गत (MCOCA) कारवाईला मंजुरी देण्यात आली आहे. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. मोक्काअंतर्गत कारवाई झालेल्यांमध्ये टोळी प्रमुख स्वप्नील संतोष मलमे (वय 20 वर्षे, रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ), सनी सुनील कुरणे (वय 23 वर्षे, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर), विशाल सुरेश कोळपे (वय 20 वर्षे, लिंबेवाडी, रांजणी, ता. कवठेमहांकाळ), सचिन विजय डोंगरे (गुलाब कॉलनी, सांगली), प्रशांत ऊर्फ बबलू संभाजी चव्हाण (वय 23 वर्षे), रोहित अंकुश मंडले (वय 22 वर्षे, दोघेही खरशिंग) ऋतिक बुद्ध माने (वय 22 वर्षे, कोकळे, ता. कवठेमहांकाळ), विक्रम तमान्ना घागरे (वय 22 वर्षे, रा. ढालगाव, ता. कवठेमहांकाळ), प्रवीण अशोक बाबर (रा. आलेगाव, ता. सांगोला), अक्षय बाळासाहेब शेंडगे (रा. कलानगर, सांगली),अवधूत सुनील पानबुडे (रा. नळभाग,सांगली), रोहित बाबासाहेब धेंडे आणि अल्पक राजकुमार कांबळे (दोघेही रा. एरंडोली, ता. मिरज), अशी संशयितांची नावे आहेत. यातील धेंडे आणि कांबळे हे दोघे अद्यापही पसार आहे.
गोळ्या झाडून शस्त्राने वार करुन नालसाब मुल्ला यांची हत्या
नालसाब मुल्ला याती 17 जून रोजी गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. मुल्लावर मोक्काअंतर्गत कारवाई झाली होती. त्यानंतर जामिनावर तो बाहेर आला होता. या प्रकरणातील संशयित सचिन डोंगरे हा देखील मोक्काअंतर्गतच कारागृहात होता. डोंगरेला जामीन मिळवून देण्यास मुल्ला प्रयत्न करत नव्हता या रागातून डोंगरेने कारागृहातूनच सूत्रे हलवत इतर तपास केला होता. संशयितांच्या माध्यमातून सचिन डोंगरेने मुल्लाचा खून केला. स्वप्नील मलमे आणि त्याच्या इतर साथीदारांवर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे यासह इतर गुन्हे दाखल आहेत. स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी या टोळीने हा प्रकार केला होता.
पोलीस अधीक्षकांच्या प्रस्ताव, विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी
नालसाब मुल्लाच्या खुनाच्या घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ तपास करुन यातील संशयितांना जेरबंद केले होते, तर मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे याला कळंबा कारागृहात ताब्यात घेत त्याच्याकडे तपास केला होता. यानंतर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्काची वाढीव कलमे लावून प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांना दिला. अधीक्षक डॉ. तेली यांनी अवलोकन करुन मंजुरीसाठी हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना दिल्यानंतर त्यांनी यास मंजुरी दिली आहे.
हेही वाचा
Sangli Crime : ज्वेलर्सची उधारी मागितली म्हणून दोघांना चाकूने भोकसले; आटपाडी तालुक्यातील घटना