Narayan Rane : खारघर घटना हा निसर्गाचा कोप, ऊन पडल्याने घडली; महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेवर नारायण राणेंची प्रतिक्रिया
खारघर घटना ही निसर्गाचा कोप आहे, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली. विरोधक सत्ता गेल्याने निराश व हताश झाले असून त्यांच्या हातात काय नसल्याने टीका करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Narayan Rane : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात भर उन्हात उष्माघाताने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खारघर प्रकरण हा निसर्गाचा कोप आहे, ऊन पडल्याने घटना घडली, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. राणे म्हणाले की, कोणी ते घडवून आणलं आहे का? निसर्गाचा कोप आहे. ऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. विरोधक म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असे आहेत. सत्ता गेल्याने निराश व हताश झाले असून त्यांच्या हातात काय राहिलं नाही म्हणून टीका करत आहेत. त्याच बरोबर राजकीय परिस्थितीवरून बोलताना महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाही, भाजप सरकार टिकेल, असा दावाही मंत्री राणे यांनी यावेळी केला.
मी कोणत्याही संजय राऊताला ओळखत नाही
खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, कोण आहेत संजय राऊत? मी कोणत्याही संजय राऊताला ओळखत नाही. कोणत्या तरी प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव घ्या, मी कोणत्याही सभेला गेलेलो नाही. मी तसे काही बोललो नाही. तसेच संजय राऊत, शिवसेना मातोश्रीचा विषय संपला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
राऊत यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मुलुंड न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे. राणे यांनी भांडुप येथील एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांच्या निवडणुकीसाठी पैसे खर्च केल्याचा आरोप केला होता. यावरून राऊत यांनी न्यायालयात धाव घेत राणेंविरोधात याचिका दाखल केली आहे. सांगली दौऱ्यावर असलेल्या राणे यांनी बोलताना खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार विजयी होतील
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसह येणाऱ्या सर्वच निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला. सांगलीमध्ये आज "लोकसभा प्रवास" अंतर्गत भाजपची बैठक पार पडली. यामध्ये आगामी सर्व निवडणुकीत भाजपचा विजय होईल, असा निर्धार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील एका हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीला खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे जेष्ठ नेते मकरंद कुलकर्णी, माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती तमनगौडा रवी पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, दीपक शिंदे-म्हैसाळकर यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांचा देखील मेळावा संपन्न झाला.
इतर महत्वाच्या बातम्या