Jayant Patil : गुंड आणि मोका लावलेल्यांच्या हाती ईश्वरपूर देऊ नका; जयंत पाटलांची महायुतीवर टीका
Jayant Patil Vs BJP Sangli : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना उरुण ईश्वरपूर नगरपरिषदमध्ये घेरण्यासाठी विरोधक एकवटल्याचं चित्र आहे.

सांगली : गुंड आणि मोका लागलेल्या लोकांच्या हातात शहर देऊ नका, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं. सांगलीच्या उरुण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीतील (Urun-Ishwarpur Municipal Council) प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. उरुण ईश्वरपूर नगर परिषदेसाठी महायुतीकडून गुंड, मोका लागलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप यावेळी जयंत पाटलांनी केला.
नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंदराव मलगुडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावेळी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पार पडला. यावेळी जयंत पाटलांनी महायुतीवर जोरदार टीका केली.
Urun-Ishwarpur Municipal Council Election : गुंडांचा विळखा पडू देऊ नका
जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ईश्वरपूरमध्ये त्यांच्याविरोधात महायुती एकवटल्याचं चित्र आहे. त्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात ताकद लावली आहे. त्यावरुनच जयंत पाटलांनी महायुतीवर टीका केली. ईश्वरपूर शहराला गुंड आणि मोका लागलेल्या लोकांचा विळखा पडू नये याची खबरदारी ईश्वरपुरकर घेतील, असं जयंत पाटील म्हणाले.
Jayant Patil Politics : भाजपच्या निष्ठावंतांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
दिवंगत माजी नगराध्यक्ष अशोकराव पाटील यांचे सुपुत्र आणि भाजपचे माजी नगरसेवक विक्रम पाटील यांचे बंधू महेश पाटील, तसेच माजी नगरसेवक विजय कुंभार यांनी भाजपला रामराम करत जयंत पाटलांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. भाजपाच्या या दोन निष्ठावंतांच्या प्रवेशाने ईश्वरपूर शहरचे राजकारण कमालीचे फिरल्याचं चित्र आहे.
पालिकेच्या राजकारणावर सावध व बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या जयंत पाटील यांनी हा प्रवेश घेऊन पहिला डाव टाकला आहे. विरोधी भाजपसह समविचारी पक्षांना हा मोठा झटका मानला जात आहे. लवकरच आणखी काही दिग्गज राष्ट्रवादीत येतील असे पाटील यांनी सांगितले आहे.
शहराच्या भविष्याविषयी काळजी असलेले हे लोक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत ही आनंदाची बाब आहे. ईश्वरपूर शहराचा विकास करण्यासाठी आपल्याला अनेक स्वप्न होती. त्या स्वप्नांची पूर्तता करायला हे शहर अधिक गतिमान झालं पाहिजे. या शहरातल्या रखडलेल्या कामांना अधिक वेगाने पुढे नेले पाहिजे. शहरातल्या नागरिकांना महाराष्ट्रातल्या इतर शहरांसारख्या सुविधा सहजगत्या उपलब्ध व्हाव्यात हा माझा प्रयत्न राहणार आहे. आमच्यावर विश्वास ठेवून अजूनही काही लोक प्रवेश करणार आहेत असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
























