Jayant Patil : जयंत पाटील यांच्या भूमिकेवर विरोधकांकडून सतत प्रहार, पण अजूनही पाटील वेट अँड वॉचची भूमिकेतच?
Jayant Patil : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने टीकेची झोड उठवली जातेय. पण तरीही जयंत पाटील सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं जातंय.
सांगली : अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत जात एकटं पडलेल्या शरद पवारांसोबत (Sharad Pawar) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत जयंत पाटलांचे नाव घेतले जाते. पण सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. जयंत पाटलांच्या भूमिका कशा भाजपसोबत जाण्याच्या होत्या याविषीय वांरवार भाष्य केलं जातं. पण यावर थेट उत्तर देणं पाटलांनी टाळलं असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या बंडानंतर जयंत पाटील आपली पुढची राजकीय वाटचाल शरद पवारांसोबत करणार की दुसरा मार्ग निवडणार यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरुये.
राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी बंड करण्याआधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. अजित पवारांच्या बंडानंतर जयंत पाटील यांनी भूमिका घेत पुन्हा राष्ट्रवादीचा गट बांधायला सुरुवात केली. पण सत्ताधाऱ्यांकडून वांरवार जयंत पाटील यांच्यासंदर्भात विधान केली जात असून धूसर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. संजय शिरसाट यांचे जयंत पाटील यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य हा त्यातीलच एक भाग असल्याचं म्हटलं जातं.
शिरसाटांनी नेमकं काय म्हटलं?
जयंत पाटील इकडे येणार होते, म्हणूनच मंत्रिमंडळ विस्तार रखडला. जयंत पाटील हे शरीराने तिकडे आणि मनाने इकडे आहेत, असं शिरसाटांनी म्हटलं. याबाबत गरज पडली तर पुरावे देखील देतो असा दावा देखील संजय शिरसाटांनी केलाय. यावर सुप्रिया सुळे यांनी शिरसाटांना आपण फॉलो करत नाही, असं म्हणत या आरोपांवर बोलणच टाळलं.
जयंत पाटलांनी काय म्हटलं?
जयंत पाटील यांनी शिरसाट यांच्या आरोपावर नेहमीप्रमाणे उत्तर देत थेटपणे बोलण्यास टाळलं. यावर त्यांनी म्हटलं की, प्रत्येकला उत्तर देत बसलो तर कामं कधी करणार. मी मनाने कुठे आहे हे शिरसाट कसे सांगू शकतात. माझं शिरसाटांशी कधीही बोलणं झालं नाही. असं असलं तरीही जयंत पाटलांनी राजारामबापू पाटील कारखाना कार्यस्थळावर असलेल्या श्रीराम मंदिरात कलश पुजन करत जय श्री रामाचा नारा दिलाच. त्याशिवाय त्यांनी राम मंदिर उद्घाटनावरुन भाजपवर टीकेची झोड उठवली.
जयंत पाटील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?
राजकीय विश्लेषकांनी देखील जयंत पाटील सध्या भाजपसोबत जाण्याच्या मनस्थित नसल्याचं म्हटलं आहे. कारण राष्ट्रवादी एकसंघ असताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा अनेकवेळा अप्रत्यक्षपणे दाखवून दिली होती. आता महाविकास आघाडीत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटील मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून दाखवला जाऊ शकतो. दरम्यान भाजप आणि अजित पवार गटात जाऊन मुख्यमंत्री होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही हे जयंत पाटलांना चांगलच माहित आहे. त्यामुळे जयंत पाटील शरद पवार यांना सोडण्याचा निर्णय घेतील अशी परिस्थिती नसल्याचे राजकीय विश्लेषक मत व्यक्त केलंय.
विरोधकांकडून जयंत पाटील यांना सतत डीवचण्याचा प्रयत्न होत असला तरीही भाजपकडून किंवा अजित पवार गटाकडून येत असलेल्या ऑफर्स पाटलांनी नाकारल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. तूर्त तरी जयंत पाटील शरद पवारांना सोडून दुसरा कोणता विचार करतील अशीही परिस्थिती नाही. कारण मुख्यमंत्री पदाचे जयंत पाटील यांनी पाहिलेले स्वप्न शरद पवारांसोबत राहूनच पूर्ण होऊ शकते हे पाटलांनी हेरलं असावं. त्यामुळेच त्यांनी भाजप आणि अजित पवार गटासोबत न जाता त्यांच्याशी दोन हात करण्याची तयारी दाखवली असल्याचं चित्र सध्या आहे.