Jayant Patil : वादग्रस्त वक्तव्य करून समाज किती पेटतो, याचं टेस्टिंग सुरु; जयंत पाटलांचा भाजपवर घणाघात
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील कासेगावमध्ये क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आणि दुसऱ्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ करण्यात आला.
Jayant Patil on BJP : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील कासेगावमध्ये क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आणि दुसऱ्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आले. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांकडून आणि राज्यपालांकडून झालेल्या बेताल वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला. वादग्रस्त विधाने करून समाज किती पेटतो, याचं टेस्टिंग सुरु असल्याचा घणाघात जयंत पाटील यांनी केला.
जयंत पाटील म्हणाले की, आज व्यक्तिस्वातंत्र्यवर गदा येत आहे. राज्यपाल इतके बोलले, तरी आम्ही गप्प आहोत. यावेळी जयंत पाटील यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भीक वक्तव्याचा पुनरुच्चार करत टीकास्त्र सोडले. समाज किती पेटून उठतोय हे अशी वादग्रस्त विधाने करून पाहिले जात असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, समान नागरी कायदा आणला जात आहे. मात्र, तो कसा असेल याची काही कल्पना नाही. कृष्णा काठच्या लोकांनी इंग्रजांना वाकवलं आहे. कृष्णा काठचे लोक कधीही झुकणार नाहीत, यामधील भारत पाटणकर आहेत. लढा कशासाठी दिला, रक्त का सांडले, हे पुन्हा पुन्हा नव्या पिढीला सांगायला हवे. जे स्मारक होत आहे ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, मला भूमिपूजन करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. सातारा आणि आता संगली जिल्ह्यातील हा वाळवा तालुका हा स्वातंत्र्यसैनिकांची, क्रांतिकारकाची भूमी राहिली आहे. नव्या पिढीला हा इतिहास किती माहिती आहे याबद्दल साशंकता आहे.
ते पुढे म्हणाले की, धरणग्रस्तांच्या नेत्या होत्याच, पण इंदूमती पाटणकर या त्यावेळी क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ देखील होत्या. स्वातंत्र्यानंततर 75 वर्ष झाली असली, तरी आता काळ कसा आहे आपण पाहत आहोत, पण या विरोधात आवाज उठवला जात नाही. रोटी-बेटीचा व्यवहार वाढवला पाहिजे. आजच्या लव जिहादच्या आंदोलनाच्या काळात एकेकाळी 50 पेक्षा जास्त लग्न कासेगावमधून प्रेमविवाह आंतरजातीय विवाहाला इंदूताई पाटणकरांकडून प्रोत्साहन दिले जात होते.
जयंत पाटील यांनी सांगितले की, आता समान नागरी कायद्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, तो कसा असेल माहीत नाही. देशातील आरक्षणाचे अधिकार काढून घेणार नाहीत ना अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे मनातील शंका खऱ्या व्हायला लागल्यात हे दुर्दैव आहे. त्यामुळे या देशात बहुजन समाजाचेच राजकारण केलं जाईल, ही भूमिका मांडणाऱ्या महात्म्यांना आपल्याला विसरता येणार नाही. ते पुन्हा नव्याने मांडावे लागतील. भारत पाटणकर अजून थकलेले नाहीत, तेच काम ते करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या