Sangli News: सांगलीत मक्याच्या शेतात गांजाची लागवड, तब्बल 150 किलो वजनाचा 15 लाखांचा गांजा जप्त
तासगाव पोलिस ठाणे हद्दीत बस्तवडेत मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केल्याचे समोर आल्याने तालुक्यात गांजाची लागवड होत असल्याने गांजा तस्करी सुरू असल्याचे समोर आलं आहे.

Ganja cultivation in a corn field: सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बस्तवडे गावामध्ये मका पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामध्ये 150 किलो वजनाचा 15 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात अजय नारायण चव्हाणला अटक करण्यात आली. तासगाव पोलिस ठाणे हद्दीत बस्तवडेत मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केल्याचे समोर आल्याने तालुक्यात गांजाची लागवड होत असल्याने गांजा तस्करी सुरू असल्याचे समोर आलं आहे.
हत्ती गवताच्या पिकात तीन ते सात फुटांची गांजाची झाडे
बस्तवडे गावातील अजय चव्हाणने त्याच्या मालकीच्या शेतात मका व हत्ती गवतामध्ये गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषणचे पथक चव्हाण वस्तीवर दाखल झाले. अजय चव्हाण हा शेतात काम करत असताना पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घरालगत असलेल्या मका पिकाची पाहणी करताना गांजाची झाडे तोडून टाकलेली आढळली. तसेच पश्चिमेकडे मका पिकात तीन ते सात फूट उंचीची पाने, फुले व बोंडे असलेली गांजाची झाडे आढळून आली. बाजूलाच हत्ती गवताच्या पिकात तीन ते सात फुटांची गांजाची झाडे आढळून आली.
एकूण 15 लाख 2 हजारांचा गांजा जप्त
चौकशीत अजयने लोकांना संशय येऊ नये म्हणून मका व हत्ती गवत पिकात गांजाची लागवड केल्याची कबुली दिली. पोलिस पथकाने पंचासमक्ष 148 किलो पाने, फुले व बोंडे असलेली 14 लाख 88 हजार 900 रुपयांची गांजाची झाडे तसेच 13 हजार 100 रुपयांचा 1 किलो 310 ग्रॅम वजनाचा अर्धवट ओलसर वाळलेला गांजा जप्त केला. एकूण 15 लाख 2 हजारांचा गांजा जप्त केला. अजय चव्हाणला तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, नितीन सावंत, कुमार पाटील, कर्मचारी अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, बाबासाहेब माने, संदीप पाटील, श्रीधन बागडी, सुशील मस्के, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी आदींनी कारवाई केली.
इतर महत्वाच्या बातम्या























