Sangli News : पठाण चित्रपट प्रदर्शित करु नका, अन्यथा आंदोलन करु; बजरंग दलाचा सांगलीतील चित्रपटगृह चालकांना इशारा
Sangli News : बजरंग दलाने सांगलीतील चित्रपटगृह चालकांना पठाण चित्रपट प्रदर्शित न करण्याची विनंती केली. पठाण चित्रपट प्रदर्शित केल्यास आंदोलन करु, असा इशाराही बजरंग दलाने दिला आहे.
Sangli News : शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांची प्रमुख भूमिका असलेल्या पठाण (Pathaan) चित्रपटाला सातत्याने विरोध होत आहे. त्यातच बजरंग दलाने (Bajrang Dal) सांगलीतील (Sangli) चित्रपटगृह चालकांना पठाण चित्रपट प्रदर्शित न करण्याची विनंती केली. पठाण चित्रपट प्रदर्शित केल्यास आंदोलन करु, असा इशाराही बजरंग दलाने दिला आहे.
गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरुन सुरु झालेला वाद अजूनही कायम
अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा पठाण चित्रपट आज (25 जानेवारी) देशभरात प्रदर्शित होत आहे. परंतु बेशरम रंग गाण्यातील दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरुन सुरु झालेला वाद काही संपण्याचं नाव घेत नाही. तेव्हापासून सुरु झालेला वाद आणि चित्रपटाला विरोध अद्यापही कायम आहेत. आता बजरंग दलाने सांगलीत हा चित्रपट प्रदर्शित करु नये अशी भूमिका घेतली आहे.
करण्याची
चित्रपटगृहचालकांना पठाण प्रदर्शित न करण्याची विनंती
बजरंग दलाने सांगली आणि मिरजेतील सर्व चित्रपटगृह चालकांची भेट घेऊन त्यांना पठाण चित्रपट आपल्या चित्रपटगृहात प्रदर्शित करु नये, अशी विनंती केली आहे. त्याचप्रमाणे हा चित्रपट रिलीज झाल्यास हिंदू समाजाच्या भावना दुखावतील. त्यानंतर तुम्हाला आंदोलनाला सामोर जावे लागेल असा इशाराही बजरंग दलाने दिला आहे. दरम्यान विजयनगर येथील चित्रपटगृहात बजरंग दलाचे कार्यकर्ते पोहोचले आणि तिथल्या व्यवस्थापकांना चित्रपट प्रदर्शित न करण्याची विनंती केली. यावेळी विश्रामबाग पोलीसही त्या ठिकाणी दाखल झाले होते.
...तर हिंदू समाज आक्रमक होईल
सनदशीर मार्गाने बजरंग दलाने पठाण चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. तसंच पठाण चित्रपट रिलीज केला तर हिंदू समाज आक्रमक होईल, असा इशाराही बजरंग दलाने दिला आहे .
पुण्यातील थिएटरबाहेरील पोस्टर बजरंग दलाने काढले
दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दोन दिवसांपूर्वी पुण्यात पाहायला मिळाले. पुण्यातील राहुल चित्रपटगृहाच्या बाहेरील पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आले. शाहरुख खानच्या काही चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर हे पोस्टर लावले होते. बजरंग दलाने राहुल थिएटरच्या चालकांना इशारा देऊन पोस्टर काढण्याची विनंती केली. त्यानंतर हे पोस्टर हटवण्यात आलं.
पठाण आज प्रेक्षकांच्या भेटीला
पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेंमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. शाहरुखसोबतच पठाण चित्रपटात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातमी
Pathaan : पठाणचं पोस्टर फाडल्याने पुण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल