(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress vs NCP in Sangli MNC : सांगली महापालिकेत काँग्रेस नगरसेवकांचा राष्ट्रवादीविरोधात नाराजीचा सूर!
सांगली महापालिकेत सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादीबरोबर जाणे ही काँग्रेसची सर्वांत मोठी चूक ठरली, अशा शब्दांत काँग्रेस नगरसेवकानी आपली खंत काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांसमोर बोलून दाखवली.
Congress vs NCP in Sangli MNC : एकीकडे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीमुळे शिवसेना आमदारांवर अन्याय झाला अशी कुरबुर करत शिवसेनेत मोठी बंडाळी निर्माण झाली असतानाच सांगली महापालिकेत काँग्रेसच्या नगरसेवकाची राष्ट्रवादीच्या विरोधातील कुरबुर वाढली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादीबरोबर जाणे ही काँग्रेसची सर्वांत मोठी चूक ठरली, अशा शब्दांत काँग्रेस नगरसेवकानी आपली खंत काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांसमोर बोलून दाखवली.
यापुढे आता सांगली, मिरज ,कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादीशी संगत करायला नको. मागील दीड वर्षांमध्ये संख्याबळ जादा असतानाही काँग्रेसने राष्ट्रवादीला महापौरपद दिले. मात्र, काँग्रेस नगरसेवकांच्या पदरात निराशा आली. गेल्या दीड वर्षात काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचे काम राष्ट्रवादीने केलेय अशी स्पष्टपणे नाराजी काँग्रेस नगरसेवकांनी काँग्रेस नेत्यासमोर बोलून दाखवली.
काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेस कमिटीत नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. कदम यांनी नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी नगरसेवकांनी राष्ट्रवादीविरोधात अनेक तक्रारी केल्या.
सांगली महापालिकेत दीड वर्षांपूर्वी भाजपची सत्ता उलथवून टाकून काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आणण्यामध्ये काँग्रेसने नेहमी राष्ट्रवादीला साथ दिली. सर्वाधिक नगरसेवक काँग्रेसचे होते. तरीही महापौरपद राष्ट्रवादीला देण्यात आले, पण महापौर पद मिळताच राष्ट्रवादीने काँग्रेसला विश्वासात न घेता कारभार सुरू केला. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात निधी न दिल्याने त्याचा प्रभागातील विकासकामांवर परिणाम झाला. एक वर्षांनंतर महापौर पद बदलण्यात येणार होते. मात्र तसे होताना दिसत नाही. आता महापालिका निवडणूक पुढल्या वर्षी आहे. आता तरी ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा राजीनामा घेऊन काँग्रेसचा एक वर्षासाठी महापौर करावा अशीही आग्रही मागणी काँग्रेस नगरसेवकानी काँग्रेस नेत्यांसमोर केलीय.
भाजपचा सत्ता हटवून काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर र महापालिकेत नगरसेवकांच्या प्रभागातील कामे होतील, या आशेने राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली. संख्याबळ जादा असताना राष्ट्रवादीला महापौरपद दिले. मात्र, काँग्रेस नगरसेवकांच्या पदरात निराशा आली. गेल्या दीड वर्षात काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचे काम राष्ट्रवादीने केले. यामुळे काँग्रेस नगरसेवकांचे नुकसान झाले. महापालिकेत राष्ट्रवादीबरोबर जाणे ही सर्वांत मोठी चूक ठरली असल्याची खंतही नगरसेवकांनी व्यक्त केली.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना एक वर्षासाठी पद दिले होते. दीड वर्षे झाले तरी महापौर पदाचा राजीनामा दिला गेला नाही. किमान व वर्षभर तरी काँग्रेसचा महापौर करावा, असे साकडे नगरसेवकांनी घातले.काँग्रेस नगरसेवकाच्या या सगळ्या नाराजीवर विश्वजित कदम यांनी लवकरच तोडगा काढू असे म्हटलं आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. प्रभागातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, जनतेच्या समस्या सोडवाव्यात, महापालिकेत सुरु असलेल्या कारभाराबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करू असेही कदम यांनी म्हंटलेय.