Sangli News: जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, सत्ताधारी भाजपकडून विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
Sangli News: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या आणि शेतीसाठी आता ग्रामस्थांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, जनावरांसाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्या वाढवावी या मागणीसाठी जत शहरामध्ये सत्ताधारी भाजपकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या आणि शेतीसाठी आता ग्रामस्थांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तातडीने जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
विशेष म्हणजे भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी काँगेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांनी देखील जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, जनावरांसाठी चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्या वाढवावी या मागणीसाठी जत शहरामध्ये रास्ता रोको करत टायर पेटवून देत राज्य सरकारचा निषेध केला होता.
विजापूर-गुहागर मार्गावर रस्ता रोको
सांगली जिल्ह्यामध्ये जुलै महिना संपत आला तरी अद्याप पावसाची समाधानकारक हजेरी नाही. त्यामध्ये दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या जत तालुक्यात पावसाने अद्याप हजेरी लावली नाही. त्यामुळे जत तालुक्यातील ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढावले आहे. गेल्या चार दिवसांपासून तालुक्यांमध्ये आठ गावांमध्ये पाण्याची 8 टँकर सुरु करण्यात आले आहेत. मात्र, पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे जत दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा, त्याबरोबर दुष्काळी सवलती तातडीने द्याव्यात, म्हैसाळ सिंचन योजनेच्या अवर्तन तातडीने सुरु करावे, यासह विविध मागणीसाठी जत शहरामध्ये तालुक्यातल्या 140 गावातील दुष्काळग्रस्तांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जत शहरा दुष्काळग्रस्तांनी मोर्चा काढत विजापूर-गुहागर मार्गावर रस्ता रोको करत वाहतूक रोखली.
महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात समाधानकारक पाऊस आतापर्यंत झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. जत तालुक्यात परिस्थिती अधिकच बिकट बनल्याने आतापासूनच दुष्काळाचे काळेकुट्ट ढग दाटून आले आहेत. कारण आजअखेर तालुक्यात केवळ 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जत तालुक्यातील गावांना कर्नाटकातून पाणी देण्याची ही मागणी जोर धरू लागली आहे. सन 2018 साली संपूर्ण मान्सूनच्या कालावधीत जत तालुक्यात अवघा 280 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यावेळी जसा गंभीर दुष्काळ जत तालुक्याने अनुभवला, तसाच अनुभव पुन्हा येणार नाही ना? याची धास्ती लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या