Vishal Patil : विशाल पाटलांची सांगलीत बंडखोरी अटळ? समर्थकांनी पहिल्याच दिवशी घेतले दोन अर्ज
वसंतदादा आघाडी नावाने विशाल पाटील हे आघाडी देखील स्थापन करणार असून त्यांच्या नावाने देखील स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे देखील पाटील यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात येत आहे.
सांगली : अखेर सांगलीमध्ये काँग्रेसने बंडखोरी केली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकाने विशाल पाटील यांच्यासाठी आज (12 एप्रिल) उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालतील निवडणूक कार्यालयातून घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसकडे वारंवार उमेदवारी मागणारे विशाल पाटील बंडखोरीच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. विशाल पाटील सोमवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी काँग्रेसकडून तिकीट मागण्यावर देखील विशाल पाटील अद्याप ठाम आहेत. काँग्रेसने सांगलीत उमेदवारी न दिल्यास विशाल पाटील यांचे सर्व समर्थक राजीनामे देणार आहेत.
वसंतदादा आघाडी नावाने विशाल पाटील आघाडी स्थापन करणार
विशाल पाटील यांच्या स्वीस सहाय्यकाने उमेदवारी अर्ज घेतल्याने विशाल पाटील यांची बंडखोरी निश्चित झाली आहे. वसंतदादा आघाडी नावाने विशाल पाटील हे आघाडी देखील स्थापन करणार असून त्यांच्या नावाने देखील स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे देखील पाटील यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे, सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून प्रक्रिया सुरु झाली आहे. 19 एप्रिल अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. भाजप उमेदवार संजय पाटील 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील दुसऱ्या दिवशी 19 एप्रिलला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत व शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत.
सांगलीतून स्वाभिमानी रिंगणात
दरम्यान, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सांगलीच्या राजकीय आखाड्यात प्रवेश झाला आहे. शेट्टी यांच्याकडून जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 2019 मध्ये आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आली होती. त्यावेळी काँग्रेसचे विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांच्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाल्याने विशाल पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे, महाविकास आघाडीने जागावाटप जाहीर केलं असलं तरी सांगलीबाबत पुनर्विचार व्हावा, अशी काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांची मागणी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या