(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!
सांगलीमध्ये संजय राऊत पोहोचल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी हॉटेलमध्ये भेट घेत स्वागत केले. यावेळी आमदार विक्रम सावंत यांनी राऊतांशी चर्चा केली.
सांगली : सांगली लोकसभेवरून (Sangli Loksabha) शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद पेटला असतानाच आज तिसऱ्या टप्प्यातील अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मनोमिलन झालं आहे का? अशी चर्चा रंगली आहे. चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून त्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सांगलीमध्ये (Sangli) पोहोचले आहेत. सांगलीमध्ये राऊत पोहोचल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी हॉटेलमध्ये भेट घेत स्वागत केले. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभूते आणि काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्यामध्ये चर्चा झाली. चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी आमदार विक्रम सावंत उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संजय राऊत, जयंत पाटील, विक्रम सावंत, अरुण लाड यांच्यासह मविआचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.
विशाल पाटलांच्या बंडखोरीने डोकेदुखी वाढली
सांगली लोकसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून बिघाडी निर्माण झाली आहे. चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आल्यानंतर विशाल पाटील आक्रमक झाले असून त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असताना चंद्रहार पाटलांची उमेदवारी ठाकरेंनी घोषित केल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला आहे. इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष व काँग्रेस असे दोन अर्ज भरले आहेत. ही बंडखोरी रोखण्यासाठी, तसेच सांगलीतील उद्धवसेनेची ताकद अजमाविण्यासाठी संजय राऊत यांनी दोन आठवड्यांपूर्वी सांगली दौरा केला होता.
संजय राऊतांच्या सांगली दौऱ्यातील वक्तव्यानी नाराजी
यावेळी त्यांनी भाजप खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेले भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप व माजी मंत्री अजित घोरपडे यांची भेट घेतली होती. दोन्ही नेते पाठिंबा देतील, अशी आशा राऊत यांना होती. मात्र, या दोन्ही नेत्यांनी विशाल पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकाही केली होती. विशाल पाटील यांचे पायलट असलेले माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे विमान गुजरातला जाईल, अशी टीका राऊत यांनी केली. त्यामुळे घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते दुखावले होते. नाराज काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांच्या बंडखोरीला प्रोत्साहन दिले होते.
इतर महत्वाच्या बातम्या