(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : दुचाकीने निघालेल्या युवकावर झेप टाकून बिबट्याचा हल्ला; वाळवा तालुक्यातील तांबवे शिवारातील घटना
Sangli News : दुचाकीवरून निघालेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवे शिवारात शनिवारी सायंकाळी घडला. हल्ल्यानंतर बिबट्याने दुचाकीचा पाठलागही केला.
Sangli News : दुचाकीवरून निघालेल्या युवकावर बिबट्याने (leopard attacked on young man in walwa)हल्ला केल्याचा प्रकार सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवे शिवारात शनिवारी सायंकाळी घडला. युवक बहेपूल ते तांबवे दंडभाग रस्त्याने जात असताना बिबट्याने दुचाकीवर झेप टाकून हल्ला केला. हल्ल्यानंतर बिबट्याने दुचाकीचा पाठलागही केला. गेल्या काही महिन्यांपूर्वी नेर्ले-कापुसखेड रस्त्यावर असा प्रकार घडला होता. शनिवारी सायंकाळच्या सुमारास तांबवे येथील रोहित जाधव हा दुचाकीवरून कामानिमित्त बहे येथे गेला होता. रोहित सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बहे-तांबवेच्या दंडभाग रस्त्यावरून घरी जात होता. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला चरी पलीकडील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर झेप मारली.
बिबट्यानेअचानक (leopard) केलेल्या हल्ल्याने रोहित घाबरला. त्याने दुचाकीचा वेग वाढवला बिबट्याने ६० ते ७० मीटरपर्यंत दुचाकीचा पाठलाग केला. गेल्या काही दिवसांपासून दंडभाग परिसरात बिबट्याचा वावर आहे. काही महिन्यांपूर्वी नेर्ले- कापुसखेड रस्त्यावर दुचाकी वरून निघालेल्या तरुणाचा बिबट्याने पाठलाग केला होता. नेर्ले, पेठ, काळमवाडी, हुबलवाडी, कापुसखेड, तांबवे शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे शिवारात नेमके किती बिबटे आहेत याबद्दल वनविभागाही अनभिज्ञ आहे.
भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या शिरला थेट स्वयंपाकघरात
दरम्यान, 11 ऑक्टोबर रोजी मांजराची शिकार करण्यासाठी पाठी लागलेला बिबट्या थेट स्वयंपाकघरात शिरण्याचा प्रकार वाळवा तालुक्यामध्येच मरळनाथपूर येथे घडला होता. मरळनाथपूर गावातील पश्चिम दिशेला असलेल्या डोंगरालगत बाळासाहेब किसन हजारे यांची वस्ती आहे. घरातील सर्वजण स्वयंपाक घरात जेवण करत असताना पाळीवर मांजर घरात आले. या मांजरापाठोपाठ बिबट्या घराच्याा पडवीतून स्वयंपाक घरात शिरला. जेवण तसेच सोडून सर्व जण बाहेरच्या पडवीत आले आणि स्वयंपाकघराचे दार कडी लावून बंद केले. तत्काळ ही माहिती वन विभागाला देण्यात आली.
वनविभागाने बिबटया लहान असल्याने त्याची आई जवळपासच रेंगाळत असल्याची शक्यता लक्षात घेत बिबट्याला पिंजर्यात बंदिस्त न करता असलेल्या खोलीचा दरवाजा उघडून, त्याच्या जाण्याचा मार्ग मोकळा केला. दार उघडताच बिबट्या घरातून बाहेर पडून नैसर्गिक अधिवासात निघून गेला.
इतर महत्वाच्या बातम्या