Sangli News : सांगलीत 400 वर्षांचा साक्षीदार वटवृक्ष उन्मळून पडला, तोच वाचवण्यासाठी हायवेची दिशा बदलली होती! आता पुन्हा एकदा वाचवण्यासाठी आर्त हाक
सुमारे चारशे वर्षांपूर्वीचा हा वटवृक्ष भोसेच्या यल्लमा देवीच्या दारात उभा आहे. नागपूर रत्नागिरी महामार्गावर असलेला हा वटवृक्ष तोडून महामार्ग निर्माण करण्याचा घाट हायवे प्राधिकारणाने घातला होता.
सांगली : रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील आणि मिरज तालुक्यातील भोसेमधील असलेला 400 वर्षांपूर्वीचे वडाचे झाड सलगच्या पावसाने आणि वाऱ्यामुळे कोसळलं आहे. या वटवृक्षाला वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय महामार्गांसाठी वृक्षतोडीबाबतचा कायदा बदलून वृक्षतोड न करण्याचा नवा कायदा केला होता. मात्र, कायदा होऊन तीन वर्षे होण्यापूर्वी महामार्गाच्या कामात कमकुवत झालेला हा वृक्ष कोसळला आहे. आता त्याचे आहे तिथेच पुनर्वसन करावे अशी भोसेतील गावकऱ्यांनी मागणी केली आहे.
सुमारे चारशे वर्षांपूर्वीचा हा वटवृक्ष भोसेच्या यल्लमा देवीच्या दारात उभा आहे. नागपूर रत्नागिरी महामार्गावर सांगलीमधील भोसेत असलेला हा वटवृक्ष तोडून महामार्ग निर्माण करण्याचा घाट हायवे प्राधिकारणाने घातला होता. मात्र पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि त्यांच्या वनराई संस्थेच्या सहकाऱ्यांनी वटवृक्षाखालीच उपोषण सुरू करून वृक्षतोडीला विरोध केला होता. या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष तोडू नये म्हणून प्रयत्न केले.
त्यांच्या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिसाद देत वटवृक्ष न तोडता रस्त्याचे डिझाईन बदलायचे आदेश दिले. त्यानुसार रस्त्याची डिझाईन बदलून वटवृक्षाला खेटून हा महामार्ग पुढे नेण्यात आला. मात्र, या कामाच्या दरम्यान वृक्षाच्या मुलांना गंभीर इजा पोहोचली असावी असे आता हा वृक्ष कोसळल्यानंतर दिसून आले आहे. महामार्गाच्या कामासाठी आधी केलेल्या खोदाईमुळे त्याच्यामुळे इजा पोचली असावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेली पाच दिवस या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. ओढ्याला प्रचंड पाणी असल्याने मुळं कमकुवत झालेला हा वटवृक्ष स्वतःच्याच भाराने कोसळला असावा अशी ग्रामस्थांची धारणा आहे.
राज्याचा कायदा बदललेल्या आणि शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वीपासून या ऐतिहासिक मार्गावर असलेल्या या वटवृक्षाचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे काम शासनाने हाती घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
400 वर्षाच्या वारशाला पुन्हा हवीय मदत
दरम्यान, सांगलीमधील प्रवीण शिंदे यांनी कळकळी विनंती केली आहे. एक वटवृक्ष किमान हजार वर्षे टिकतो, त्याचे उपवृक्ष तयार करून ठेवतो, या ऐतिहासिक झाडाने सेवा केलीय आहे. भोसे गावासह जिल्ह्याला ओळख निर्माण करून दिली. वारसावृक्ष असणाऱ्या या झाडाबद्दल आपल्याला आता कृतघ्न होऊन चालणार नाही. हे झाड शास्त्रीय दृष्ट्या जपण्यासाठी शासन, प्रशासन यांच्याकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही हवी ती तज्ज्ञ माहिती द्यायला तयार आहे, पण हा वारसा जपायला हवा, यासाठी आता पुन्हा एकदा या वटवृक्षाला सर्वांच्या मदतीची गरज आहे. सर्वांनी शासन प्रशासनाकडे मागणी करण्यासाठी ज्याच्या त्याच्या पातळीवर प्रयत्न करावेत, असे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या