Sangli News : सांगलीत निर्धार फौंडेशनकडून सलग 75 तास स्वच्छता, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्तुत्य उपक्रम
सांगली, मिरज, कुपवाड मनपा क्षेत्रात शहराची स्वच्छता हे एक व्रत मानून अव्याहतपणे स्वच्छता चळवळ राबवणाऱ्या निर्धार फौंडेशनने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सलग 75 तास स्वच्छता मोहीम राबवली.
Sangli News : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात शहराची स्वच्छता हे एक व्रत मानून अव्याहतपणे स्वच्छता चळवळ राबवणाऱ्या निर्धार फौंडेशनने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सलग 75 तास स्वच्छता मोहीम राबवली.
निर्धार फौंडेशनचे संस्थापक राकेश दड्डणावर आणि त्यांच्या टीमने ही मोहीम शहरभर राबवली. निर्धार फौंडेशनने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे माजी मंत्री जयंत पाटील, विश्वजीत कदम यांनी कौतुक करत या टीमला शुभेच्छा दिल्या. महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी या उपक्रमाच्या ठिकाणी सदिच्छा भेट देत निर्धार फौंडेशन आणि त्यांच्या टीमचे ते राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगली शहरात राकेश दड्डणावर व टीमकडून सलग 75 तास स्वच्छता अभियान सुरू होते.12 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजल्यापासून सांगली बस स्थानकापासून याची सुरुवात करण्यात आली.15 ऑगस्ट दुपारी 12 पर्यंत राम मंदिर काँर्नर या परिसरात अभियानास 75 तास पूर्ण झाले.
सांगली शहरातील मुख्य बसस्थानकाचा संपूर्ण परिसर, स्टेशन चौक, राममंदिर चौक ते पुष्पराज चौक, विश्रामबाग चौक, महात्मा गांधी वसतीगृहासमोरील परिसर व गणेशदुर्ग भुईकोट किल्ल्यावरील वाढलेली झाडे व गवत देखील काढण्यात आले. या सगळ्या ठिकाणांची संपूर्ण परिसराची स्वच्छता व काही ठिकाणी रंगरंगोटी करून त्याचा कायापालट करण्यात आला आहे. जिल्हा परिषद समोरील रोडडियावडर मधील बिट्टीच्या रोपांची छाटणी करून तण देखील काढण्याचे काम करण्यात आले. या मोहिमेत सांगली-मिरज रोडवरील अडगळीत पडलेल्या 2 बसस्टॉपला नवसंजीवनी देऊन पुन्हा एका नव्या रूपात आणण्याचे काम निर्धार फौंडेशनकडूनच्या या 75 तास स्वच्छता उपक्रमात पूर्ण झाले.
महापुरात निर्धार फौंडेशनकडून मोठं काम
महापुराच्या काळात देखील निर्धार फौंडेशनकडून नदी काठापासून ते ज्या ज्या भागात पुराचे पाणी आले त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम निर्धार फौंडेशनकडून करण्यात आलं होतं. पुरामुळे नदी काठी आलेला गाळ काढण्याचे काम देखील या टीमने केले होते.
आयुक्त-उपायुक्तांकडून कौतुकाची थाप
निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांनी जवळपास 1500 दिवस स्वच्छता अभियान केलं आहे. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 तास सलग स्वच्छता करण्याचा ठरवलं आणि तो उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाला शुभेच्छा देताना आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत निर्धार फौंडेशनच्या महापालिका क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमास मदत करण्याचे आश्वासन यावेळी आयुक्त-उपायुक्तांनी दिले.
या उपक्रमात विविध सामाजिक संस्था,महिला व युवक मंडळांनी देखील सहभाग नोंदविला. रोहित कोळी, अनिरुद्ध कुंभार, मानतेश कांबळे, सोमनाथ पतंगे, भाग्यश्री दिवाळकर, संध्या आवळे आदिंसह युवक युवतींनी श्रमदानासाठी मेहनत घेतली.