Sangli Crime : शतावरी रोपांच्या लागवडीच्या आमिषाने पलूसच्या शेतकऱ्यांची 17 लाखांची फसवणूक, शिवाई ॲग्रो कंपनीच्या संचालकांना अटक
Sangli Crime : पलूस तालुक्यातील काही शेतकऱ्यांची 17 लाखांची फसवणूक करणाऱ्या शिवाई ॲग्रो कंपनीच्या संचालकांना अटक करण्यात आली आहे. पलूस न्यायालयाने त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Sangli Crime : पलूस तालुक्यातील काही शेतकऱ्यांची 17 लाखांची फसवणूक करणाऱ्या शिवाई ॲग्रो कंपनीच्या संचालकांना अटक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या शिवाई ॲग्रो हेल्थ कंपनीचे संचालक मनोज दिगबंर काळदाते (वय 49, रा. धायरी, श्री अपार्टमेंट पुणे) व गणेश अशोक निंबाळकर (वय 32, रा. चिट, ता. करमाळा, जि. सोलापूर) या दोघांना पुणे व सोलापूर येथून अटक करण्यात आली.
पलूस न्यायालयाने त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शतावरी पिकाची लागवड करावयास शतावरीची रोपे 1 रुपयाप्रमाणे मिळत असताना कंपनीतील डायरेक्टर यांनी 20 रुपये प्रति रोपाप्रमाणे देवून पिकाची वाढ झाल्यानंतर 250 प्रति किलोप्रमाणे घेवून जातो, असे सांगून पिकाची वाढ झालेनंतर ठरलेल्या दराप्रमाणे शतावरीची पिके घेवून गेले नाहीत. म्हणून पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पलूस तालुक्यातील शिवाजी माळी व परिसरातील शेतकऱ्यांनी शिवाई ॲग्रो हेल्थ प्रा. लि. पुणे या कंपनीचे संचालक मनोज काळदाते, गणेश निंबाळकर व प्रवीण अलई (रा. देवळा, नाशिक) यांच्याशी संपर्क साधून शतावरी या औषधी रोपाची 5 फेब्रुवारी 2019 रोजी करार पद्धतीने लागवड केली होती. त्यावेळी कंपनीने शतावरीच्या एका रोपाची किंमत रुपया असताना शेतकऱ्यांना प्रति रोप 20 रुपयाप्रमाणे देण्यात आले होते. त्यानंतर या रोपाची पूर्ण वाढ झाल्यावर ते पक्व पीक 250 रुपये प्रति झाड असे घेण्याचा करार ठरला होता.
परंतु पक्वतेचा कालावधी होताच 23 मार्च 2022 रोजी शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीकडे संचालकांकडे याबाबत विचारणा केली. परंतु ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे संबंधित कंपनीच्या संचालकांनी 16 लाख 83 हजाराचे नुकसान केल्याची तक्रार पलूस पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.
यावरून पलूस पोलिसांनी आरोपींच्या मोबाइल लोकेशन वरून मनोज काळदातेला पुण्यातून, तर गणेश निंबाळकरला सोलापूर येथून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. दोघांना पलूस येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव करत आहेत.