Ratnagiri News : चाकरमान्यांचं स्वागत, चहापाण्याची व्यवस्था करा, शिक्षकांची एसटी आगारात नोकरी
Ratnagiri News : कोकणात (Konkan) गणेशोत्सवासाठी (Ganesh Utsav 2022) येणाऱ्या चाकरमान्यांच्याबाबतीत नियोजन करण्यासाठी चक्क प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ड्युटी एसटी आगारामध्ये (ST Depot) लावण्यात आली आहे.
Ratnagiri News : निवडणुकीच्या काळात किंवा जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची (Teachers) ड्युटी लागणं आता काही नवी गोष्ट राहिलेली नाही. परंतु कोकणात (Konkan) गणेशोत्सवासाठी (Ganesh Utsav 2022) येणाऱ्या चाकरमान्यांच्याबाबतीत नियोजन करण्यासाठी चक्क प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ड्युटी एसटी आगारामध्ये (ST Depot) लावण्यात आली आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा प्रशासनाने याबाबत आदेश काढले आहेत. यावरुन आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कारण राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे कोकणातले आहेत. त्याच कोकणातील शिक्षकांना चाकरमान्यांचं नियोजन करण्याचं काम दिलं आहे.
राजापूरमधील 850 पैकी 39 शिक्षकांची ड्युटी एसटी आगारात
रत्नागिरी जिल्ह्यातल्या केवळ राजापूर तालुक्यातील 39 शिक्षकांची ड्युटी राजापूर आगारात लावण्यात आली आहे. दररोज तीन शिक्षक हे किमान आठ आठ तास एसटी आगारात ड्युटी करणार आहेत. पण, याबाबत शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. राजापूर तालुक्यात जवळपास 850 शिक्षक आहेत. पैकी 39 शिक्षकांची ड्युटी ही राजापूर आगार येथे लावण्यात आली आहे. पण शिक्षक संघटनांनी आता पत्रक देत याबाबत आक्षेप घेतला आहे.
सत्यजीत तांबे यांच्याकडून निषेध, दीपक केसरकरांवर निशाणा
दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही ट्वीट करुन या निर्णयावर आक्षेप घेत रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. सोबतच कोकणातील नेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "कोकणातील शिक्षकांना गणपतीसाठी गावाकडे येणाऱ्या लोकांसाठी चहापान व्यवस्था करण्याचे आदेश काढणाऱ्या रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध. बरं राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर हे कोकणातीलच आहेत. शिक्षकांना शिक्षण सोडून इतर कामे द्यायची व शैक्षणिक गुणवत्तेवरून जबाबदारही धरायचं. वा रे!"
कोकणातील शिक्षकांना गणपतीसाठी गावाकडे येणाऱ्या लोकांसाठी चहापान व्यवस्था करण्याचे आदेश काढणाऱ्या रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध.
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) August 31, 2022
बरं राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर हे कोकणातीलच आहेत.
शिक्षकांना शिक्षण सोडून इतर कामे द्यायची व शैक्षणिक गुणवत्तेवरून जबाबदारही धरायचं. वा रे! pic.twitter.com/4xSeARw7Lh
राजापूरपासून जवळच असलेल्या शिक्षकांची ड्युटी : एस ए कडू, गटशिक्षणाधिकारी
या संपूर्ण विषयावर एबीपी माझाने राजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. ए. कडू यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी सदरचा निर्णय हा प्रांत आणि तहसीलदार मॅडम यांच्या आदेशानुसार घेण्यात आल्याचं सांगितलं. "दररोज केवळ तीन शिक्षक राजापूर एसटी आगारामध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत असतील. रोज एक शिक्षक आठ तास ड्युटी करेल. त्यानंतर पुढील 13 दिवसांमध्ये त्याला अशाप्रकारचं काम लागणार नाही. सुट्टीसाठी जिल्हा बाहेर न गेलेले शिवाय राजापूरपासून जवळच असलेल्या शिक्षकांची ड्युटी यासाठी लावण्यात आली आहे," अशी माहिती एस ए कडू यांनी दिली.