Konkan Politics : शिंदे की ठाकरे गट? रत्नागिरीतील माजी नगरसेवक खेळतायत खो-खो!
सध्या पदाधिकाऱ्यांना पाठिंबा, प्रतिज्ञापत्र लिहून घेणे, मोर्चा काढणं, जोरदार शक्तीप्रदर्शन करणे आदि गोष्टी सध्या सुरु आहेत. शिंदे गट की ठाकरे गट यांना पाठिंबा देण्यावरुन माजी नगरसेवक खो-खो खेळत असल्याचं चित्र रत्नागिरीत पाहायला मिळत आहे.

Ratnagiri News : शिवसेनेत (Shiv Sena) झालेल्या बंडाळीनंतर मागील महिनाभरापासून शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) यांच्यात एकप्रकारे चढाओढ लागली आहे. सध्या पदाधिकाऱ्यांना पाठिंबा, प्रतिज्ञापत्र लिहून घेणे, मोर्चा काढणं, जोरदार शक्तीप्रदर्शन करणे आदि गोष्टी सध्या सुरु आहेत. यामध्ये कोकण देखील कुठेच मागे नाही. कारण, योगेश कदम (Yogesh Kadam), उदय सामंत (Uday Samant) आणि दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्यासोबत कार्यकर्ते आणि काही नेते देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा देताना दिसून येत आहे. चिपळूणमध्ये तर एकनाथ शिंदे यांच्या वर्षभरापूर्वी तालुक्यातील महापुरात केलेल्या मदतीसाठी आभार प्रदर्शनाकरता लावलेला होर्डिंगवरुन राजकीय वातावरण देखील तंग झालेलं दिसून आलं. या साऱ्यामध्ये रत्नागिरी शहारातील घडामोडींकडे डोळेझाक करुन चालणार नाही. कारण, शिवसेनेने विनायक राऊत यांच्या नेतृत्वात निर्धार मेळावा घेत उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल चढवला. पण, उदय सामंत रत्नागिरी येथे आले आणि त्यांच्यासोबत नेमकं कोण? याचं चित्र देखील स्पष्ट होऊ लागलं. रत्नागिरील शहरातील 20 माजी नगरसेवकांनी रत्नागिरी शहरातील माळनाका येथील शासकीय विश्रामगृहावर सामंत यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. पण, त्यानंतर चारच दिवसात शिवसेना उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी माजी खासदार अनंत गिते यांच्या उपस्थितीत आमच्यासोबत जवळपास 7 माजी नगरसेवक असल्याचा दावा केला. पण, त्यानंतर उदय सामंत यांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी करत नगरसेवकांचा पाठिंबा नेमका कुणाला? याबाबतचं चित्र स्पष्ट केलं.
सामंतांनी दाखवला आंखो देखा हाल!सोमवारी अर्थात काल रात्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना विश्रामगृहावर 8 वाजण्याच्या सुमारास बोलावलं. यावेळी तिथं 20 माजी नगरसेवक देखील हजर होते. नगरसेवकांचा पाठिंबा कुणाला? याबाबत सवाल, दावे केले जात असताना सामंत यांनी सर्व नगरसेवकांना एकत्र करत त्यांचा पाठिंबा नेमका कुणाला आहे? याचं चित्र स्पष्ट केलं. यावेळी उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी आम्ही उदय सामंत यांच्यासोबत आहोत. रत्नागिरी शहराच्या विकासात त्यांचं योगदान आहे. शिवाय, पुढे देखील शहराचा विकास व्हावा यासाठी आम्ही त्यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली. उदय सामंत यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी स्मितल पावसकर, मुसा काझी, निमेश नायर, राजन शेट्ये, कौशल्या शेट्ये, रोशन फाळके, दिशा साळवी, शिल्पा सुर्वे, राजेश्वरी शेट्ये, श्रद्धा हळदणकर, विकास पाटील, सुहेल साखरकर, सुहेल मुकादम, वसंत पाटील, दया चवंडे, वैभवी खेडेकर, बावा नागवेकर, बंटी कीर, उज्ज्वला शेट्ये नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
2 तासात दोन नगरसेवक साळवींच्या भेटीला!
उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर जवळपास दोनच तासात दोन माजी नगरसेवकांनी शिवसेना उपनेते आणि आमदार राजन साळवी यांची भेट घेतली. यामध्ये बाबा नागवेकर आणि बंटी कीर यांचा समावेश आहे. काही वेळापूर्वी उदय सामंत यांच्यासोबत आहोत हे दर्शवण्यासाठी विश्रामगृह इथं जमलेल्या 20 माजी नगरसेवकांमध्ये या दोन नगरसेवकांचा देखील समावेश होता. त्यामुळे सध्या शिंदे गट की ठाकरे गट यांना पाठिंबा देण्यावरुन माजी नगरसेवक खो-खो खेळत असल्याचं चित्र आणि त्याबाबची चर्चा रत्नागिरी शहरामध्ये सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
