(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratnagiri Refinery Survey : रिफायनरीच्या सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध, जमावबंदी असूनही बारसू माळरानावर रिफायनरी विरोधक जमले
कोकणातील (Konkan) प्रस्तावित नाणार रिफायनरीच्या सर्वेक्षणाला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव गावात सर्वेक्षणासाठी जवळपास दीड ते दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Ratnagiri News : कोकणातील (Konkan Newsve) प्रस्तावित नाणार रिफायनरीच्या सर्वेक्षणाला (Nanar Refinery Sury) आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. रत्नागिरीच्या (Ratnagiri) राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव गावात सर्वेक्षणासाठी जवळपास दीड ते दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर बारसू सोलगावसह आजपासच्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. गावागावातील ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसंच बारसू आणि सोलगावच्या परिसरात आज पोलिसांचा रुट मार्च देखील होणार आहे. रिफायनरी सर्वेक्षणासाठी 22 एप्रिल 2023 ते 31 मे 2023 हा कालावधी ठरवण्यात आलेला आहे.
बारसू-सोलगाव रिफायनरीसाठीच्या सर्वेक्षणाला अनेक स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. बारसूच्या माळरानावर रिफायनरी विरोधक हजारोंच्या संख्येने जमले आहेत. रिफायनरी प्रकल्प आणि सरकारविरोधात ते घोषणा देत आहेत. बेमुदत आंदोलन करण्याच्या तयारीनेच हे विरोधक जमले आहेत, कारण ते जीवनावश्यक वस्तू सोबत घेऊन आले आहेत.
महिलेला उष्माघाताचा त्रास
रिफायनरी विरोधातील आंदोलनातील एका महिलेला उष्माघाताचा त्रास झाला. आजूबाजूच्या महिलांनी आणि ग्रामस्थांनी महिलेला रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. जीव गेला तरी चालेल पण रुग्णालयात जाणार नाही, असं म्हणत संबंधित महिलेने आंदोलनस्थळी कायम राहण्याचा निर्णय घेतला.
रिफायनरी विरोधक नेत्यांना तालुका बंदी
दरम्यान हे सर्वेक्षण सुरु असतानाच रिफायनरी विरोधकांच्या प्रमुख नेत्यांना तालुका बंदी करण्यात आली आहे. गावागावातील काही प्रमुख घरांवर पोलिसांनी नोटीस लावल्या आहे. कालपासून विरोधकांच्या नेत्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. काही नेते सध्या अंडरग्राउंड आहेत. तर रिफायनरी विरोधकांचे नेते सत्यजित चव्हाण आणि त्यांचा सहकारी मंगेश चव्हाण यांना 25 तारीखपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सत्यजित चव्हाण यांनी कोठडीतून आंदोलकांना संदेश पाठवला आहे. "कितीही दिवस जाऊ दे...जमीन धरुन राहा... आर या पार..." असा संदेश चिठ्ठीवर लिहिला आहे. मात्र कोकणातील रिफायनरी विरोधक आंदोलनावर ठाम आहेत.
पोलिसांच्या गाडीला अपघात
दुसरीकडे रिफायनरी सर्वेक्षणाच्या बंदोबस्तासाठी निघालेलेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. कशेळी बांध इथे पोलीस व्हॅन उलटली आणि अपघात झाला. या अपघातात 17 पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
उद्धव ठाकरेंची उद्या पत्रकार परिषद
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या (25 एप्रिल) कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेणार आहे. सध्या पोलीस बळाच्या होत असलेल्या वापरावर उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलणार आहे. दुपारी दोनच्या सुमारास ही पत्रकार परिषद असेल. तसेच उद्धव ठाकरे हे राज्यपालांची देखील भेट घेणार आहेत.
तर कोकणात येऊन शेतकऱ्यांना पाठिंबा देऊ : राजू शेट्टी
तर पोलीस बाळाचा वापर वाढल्यास स्थानिक लोकांच्या बाजूने उभे राहणार आणि वेळ पडल्यास कोकणात येऊन शेतकऱ्यांना पाठिंबा देणार, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घेतली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
VIDEO : Nanar Refinery Survey : बारसू सर्वेक्षणाला तीव्र विरोध, स्थानिकांचं आंदोलन माळरानावर