MNS : अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या पदयात्रेचं आयोजन आता कसं करणार? पदाधिकाऱ्यांचे मोबाईल जप्त केल्यानंतर मनसेपुढे यक्षप्रश्न
MNS Rally : मुंबई - गोवा महामार्गावरील हातविले टोलनाक्याची तोडफोड मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली मनसेची पदयात्रा मोहिम निघणार आहे. पण आता या पदयात्रेचे आयोजन कसं करायचं हा यक्षप्रश्न मनसेसमोर उभा राहिला आहे. कारण तीन दिवसांपूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या सीमेवरील टोलनाक्याची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली होती.
त्यानंतर राजापूर पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. आता या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले होते. या सर्व पदाधिकाऱ्यांना शनिवारी जामीन देखील मिळाला. पण त्यांचे मोबाईल अजूनही पोलिसांच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
कोर्टात जाऊन मोबाईल घ्या
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या परिस्थितीवर टीका केल्यानंतर मनसे आक्रमक झाली. मनसेकडून मुंबई - गोवा महामार्गावरील टोलनाक्यांची तोडफोड करण्यात येत आहे. त्यातच हातविले टोलनाक्याची तोडफोड केल्यानंतर या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांना जामीन देखील मिळाला. पण त्यांचे मोबाईल घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना कोर्टात जाण्यास सांगितले आहे. तसेच कोर्टात जाऊन मोबाईल घेण्यास या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी सांगितले आहे.
संपर्क साधण्यास अडचण
मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 23 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट रोजी मनसेकडून पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेचे नियोजन करण्यासाठी कोकणातल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. पंरतु या पदाधिकाऱ्यांचे मोबाईलच पोलिसांच्या ताब्यात असल्याने संपर्क साधण्यास मनसेच्या नेत्यांना अडचण होत आहे. त्यामुळे आता या यात्रेचे नियोजन कसे करायचे हा प्रश्न मनसेपुढे उभा राहिला आहे. यासंदर्भात मुंबईत देखील मनसेच्या बैठका पार पडत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर या बैठकांमध्ये काही तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान याच संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी 'एबीपी माझा'ने रत्नागिरी पोलीस स्थानकातील अधिकारी मारुती जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु त्यांनी व्यस्त असण्याचे कारण देत यावर भाष्य करण्याचे टाळले. त्यामुळे आता मनसेच्या पदयात्रेचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मनसेकडून पदयात्रेचे आयोजन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन सरकार आणि विरोधकांचे कान टोचले. त्यानंतर तीन टप्प्यांमध्ये मनसेकडून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामधील तिसऱ्या टप्प्यात मनसेकडून गाव जनजागृतीची मोहिम देखील राबवण्यात येणार आहे. त्यामुळे मनसेची ही पदयात्रा मोहिम ही आता कशी योजिली जाणार यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.