Mumbai Goa Highway : रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेची पदयात्रा; अमित ठाकरे करणार यात्रेचं नेतृत्व
MNS Yatra : पनवेलमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये या मुद्यावरुन आंदोलन करण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता.
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai - Goa Higway) 23 ते 30 ऑगस्ट रोजी मनसेची पदयात्रा निघणार आहे. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेकडून (MNS) ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यान, मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघणार आहे. तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे. ही पदयात्रा तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात चालत ही पदयात्रा करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात मनससेकडून गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.
राज ठाकरे यांनी दिला होता इशारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच पनवेलमध्ये मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका टीप्पणी केली होती. तसेच या मुद्द्यावरुन विविध प्रकारचे आंदोलन करण्याचे आदेश देखील राज ठाकरे यांनी दिले होते. राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर मनसे खड्ड्यांच्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेकडून वांरवार मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्याला हात घातला जात आहे. पण तरीही या महामार्गाची अवस्था जैसे थेच आहे. त्यामुळे मनसेचे हे आंदोलन तरी यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारला जागं करण्यासाठी ही जागर यात्रा : देशपांडे
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला आहे. सरकारला जागं करण्यासाठी ही जागर यात्रा काढण्यात येणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी दोन महिन्यांत राज्यात पडलेल्या खड्डयांच्या अवस्थेवर देखील भाष्य केलं आहे. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, कोणतही शहर घ्या किंवा महामार्ग तिथल्या रस्त्यांवर खड्डे पडलेलेच आहेत. सरकार गणपतीपर्यंत काम पूर्ण होणार असल्याचं फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे आम्ही ही जागर यात्रा काढणार आहोत.
यावेळी संदीप देशपांडे यांनी या यात्रेविषयी देखील माहिती दिली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा हा पळस्पे ते माणगाव निघणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर या यात्रेचा दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. तसेच यावेळी कोकणातल्या लोकांनाही यात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मनसेचे या जनजागृती यात्रेला लोकांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Raj Thackeray : खड्डे, वाढतं शहर अन् टाऊन प्लॅनिंग; पुणे शहराबाबत राज ठाकरे काय म्हणाले?