Ratnagiri District : कोकणातील प्रमुख आणि महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे रत्नागिरी. तसं म्हटलं तर राजकीयदृष्ट्या शांत, पण अधिक उलथापालथी होत असलेला हा जिल्हा. अणुऊर्जा प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प, संभाव्य बॉक्साईट उत्खनन यासारख्या प्रकल्पांमुळे प्रसिद्ध असलेला हा जिल्हा. मासेमारी आणि हापूस आंब्यावर देखील याचं मुख्य अर्थकारण. शिवाय, पर्यटनासाठी मिळणारी पर्यटकांची पसंती देखील नजरअंदाज करून चालणार नाही.
स्वातंत्र्यानंतर समाजवाद, काँग्रेस आणि सद्यस्थितीत शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख. राज्याच्या राजकारणात जिल्हा फारसा केंद्रस्थानी नसला तरी मुंबई, कल्याण, ठाणे या ठिकाणी होणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या राजकारणावर कोकणी माणसाचा प्रभाव स्वाभाविकपणे दिसून येतो. त्यामुळे या जिल्ह्यातील विविध भागांमधून मोठ्या शहरांमध्ये होणारं स्थालांतर देखील लक्षणीय. मुंबईसारख्या महानगर क्षेत्रात होणारं राजकारण, त्यावर कोकणी माणसाचा पडणारा प्रभाव, मोठे प्रकल्प यामुळे सध्या या जिल्ह्याला देखील अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. पण, लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात उलथापालथी होताना दिसून येत आहेत.
भाजपनं देखील आता पक्ष बांधणीसाठी लक्ष केंद्रीत केल्यानं कोकणी माणसाची साथ कुणाला मिळणार? विधानसभेत कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येणार? याच्या गजाल्या आतापासून रंगल्या आहेत. शिवेसेनेत झालेल्या मोठ्या फुटीनंतर कोकणी माणसाची मिळणारी साथ ही शिंदेंना कि ठाकरेंना? तसेच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात कुणाचा वरचष्मा राहणार? याची देखील आकडेमोड आतापासून सुरू झाली आहे. लक्षणाीय बाब म्हणजे राज्यासह देशाच्या तिजोरीत देखील चांगली भर घालतील असे प्रकल्प या जिल्ह्यात आहेत. पण, विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचं भवितव्य ठरणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारण एका अर्थकारणावर देखील खेळलं जात असल्याचं चित्र आहे.
निसर्गसंपन्न अशा जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुका राजकीयदृष्ट्या कुणाला संपन्न करून जाणार याची उत्सुकता देखील जिल्ह्याच्या राजकारणात आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण मतदाराच्या हातात सर्वच राजकीय पक्षांच्या नाड्या आहेत. त्यामुळे ग्रामीण मतदार काय करणार? तो कुणाच्या पारड्यात मत टाकणार? यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून आहेत. कोकणाचा होऊ घातलेला विकास नेमका जिल्हावासियांना कसा वाटतो? या प्रश्नांची उत्तरं देखील याच निवडणुकीतून मिळणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारसंघ
2 ) रत्नागिरी - संगमेश्वर - उदय सामंत ( शिंदे गट )
3 ) चिपळूण - संगमेश्वर - शेखर निकम ( अजित पवार गट )
4 ) गुहागर - भास्कर जाधव ( ठाकरे गट )
5 ) खेड - दापोली - मंडणगड - योगेश कदम ( शिंदे गट )
2019 मध्ये कुणाला किती मतं?
1 ) 1 ) राजापूर - लांजा - साखरपा : अगदी दगडाला देखील भगवा लावून त्याला उमेदवारी दिल्यास तो आमदार म्हणून विधिमंडळात जाईल असं वर्णन करत हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला कसा आहे ? यासाठी दिलं जाणारं हे उदाहरण पुरेसं आहे. उद्धव ठाकरेंसोबत असलेले राजन साळवी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार. राजन साळवी याच मतदरासंघातून चौथ्यांदा या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सध्या तरी निश्चित मानलं जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राजन साळवी यांना 65,433 मतं मिळाली होती. त्यांच्या मतांची आकडेवारी हि 50.4 टक्के होती. त्यांना काँग्रेसच्या अविनाश लाड यांनी चांगलीच टक्कर दिली होती. लाड यांना 41.3 म्हणजे 53,557 मतं मिळाली होती. 11,876 मतांनी साळवी यावेळी विजयी झाले होते. एकूण 2 लाख 37 हजार 886 मतांपैकी 1 लाख 29 हजार 816 जणांनी मतदान केलं होतं.
2 ) रत्नागिरी - संगमेश्वर : शिदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत या ठिकाणचे विद्यमान आमदार. 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर आत्तापर्यंत कामगिरी सरस ठेवण्यात सामंतांना यश मिळालं आहे. 2004 , 2009 च्या दोन्ही निवडणुका सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवल्या. पण, 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सामंत यांनी धनुष्यबाण हाती घेतला. मुख्यबाब म्हणजे बंडानंतर ठाकरेंसोबत कायम असण्याची भाषा करणारे सामंत ऐनवेळी शिंदेंसोबत गेले. 2019 मध्ये उदय सामंता यांनी शिवसेनेकडून लढताना 1 लाख 58 हजार 514 मतांपैकी 1 लाख 18 हजार 484 म्हणजेच 74.8 टक्के मतं घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुदेश मयेकर यांचा पराभव केला. मयेकर यांना 19.7 टक्के म्हणजे 31,146 मतं मिळाली. 2019 मध्ये
रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात 1 लाख 58 हजार 514 जणांनी मतदान केलं होतं. दरम्यान, 2019 मध्ये सामंत यांच्याविरोधात लढणाऱ्या मेयकर यांनी सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
3 ) चिपळूण - संगमेश्वर : सरांच्या वैयक्तिक करिष्म्यापुढे विरोधक टिकणार का? अशी चर्चा करत सध्या अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या शेखर निकम यांच्या राजकीय वर्चस्वाबाबत बोललं जातं. तसं म्हटलं तर चिपळूण - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची विशेषता ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद नाकारून चालणार नाही. 2019मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम यांना 1 लाख 1 हजार 578 मतं मिळाली होती. त्यांनी शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांचा पराभव केला होता. चव्हाण यांना 71 हजार 654 मतं मिळाली होती. 2 लाख 69 हजार 322 मतदारांपैकी 1 लाख 75 हजार 624 मतदारांनी म्हणजे 66.1 टक्के इतकं मतदान या विधानसभा मतदार संघात झाले. पैकी 57.8 टक्के मतं निकम यांना तर 40.8 टक्के मतं हि चव्हाण यांना मिळाली. पण, सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर चिपळूण - संगमेश्वर या मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांनी दावा केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. मुख्यबाब म्हणजे जागा कुणाला मिळणार? हे पाहावं लागणार आहे.
4 ) गुहागर : शिवसेनेचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांचा हा मतदारसंघ. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 39 हजार 663 मतदारांपैकी 59.6 टक्के म्हणजे 1 लाख 40 हजार 647 मतादारांनी मतदान केलं . पैकी भास्कर जाधव यांना 56 टक्के म्हणजे 78 हजार 748 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहदेव बेटकर यांना 52 हजार 297 म्हणजे एकूण झालेल्या मतदानापैकी 37.2 टक्के मिळाली. पण, सध्या बेटकर शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. तर, महायुतीमध्ये भाजपनं या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक हि रंजक असणार आहे.
5 ) खेड - दापोली - मंडणगड : उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंसोबत गेलेले योगेश कदम या मतदारसंघाचे विद्यमान आमदार. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 95 हजार 364 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय कदम यांना 81 हजार 876 मतं मिळाली. योगेश कदम यांना 52.1 टक्के मतं मिळाली. तर, संजय कदम यांना 44.7 टक्के मतं मिळाली. 2019 मध्ये खेड - दापोली - मंडणगड या विधानसभा मतदारसंघात 2 लाख 79 हजार 500 मतदार होते. पैकी 1 लाख 83 हजार 150 जणांनी म्हणजेच 66.5 टक्के मतदारांनी मतदान केले.
हेही वाचा:
विधानसभेची खडाजंगी: सोलापुरात 11 विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती