Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
धस यांनी आपल्या भाषणातून दिला संतोषचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का अशी विचारणा सुद्धा केली. चांगला माणूस खंडणीच्या आडवा आला म्हणून सरपंच गेल्याची भावना यावेळी सुरेश धस यांनी व्यक्त केली.
Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी राज्यामध्ये जनआक्रोश मोर्चे सुरूच आहेत. आज धाराशिवमध्ये संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे, वाल्मीक कराडवर कडाडून हल्लाबोल केला. संतोष देशमुख यांच्या प्रकरणात न्याय मागण्याची मागणी होत असताना लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे यांनी घेतलेल्या भूमिकेवरूनही धस यांनी घणाघाती प्रहार केला.
हाके साहेब, कोणाची उचल घेऊन बोलत जाऊ नका
हाके साहेब पाया पडतो कोणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, अशा शब्दात सुरेश धस यांनी लक्ष्मण हाके यांनी घेतलेल्या भूमिकेवरती कडाडून प्रहार केला. आई शप्पथ सांगतो असे म्हणत त्यांनी उचल शब्द आपला खटकला असेल, तर मागे घेतो. मात्र, कोणाच्या सांगण्यावरून असे उद्योग करू नका असा सल्ला त्यांनी दिला. धस यांनी आपल्या भाषणातून दिला संतोषचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का अशी विचारणा सुद्धा केली. चांगला माणूस खंडणीच्या आडवा आला म्हणून सरपंच गेल्याची भावना यावेळी सुरेश धस यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना सुरेश धस यांनी प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या वक्तव्याचा सुद्धा चांगला समाचार घेतला.
आणि तुम्ही म्हणता अख्खा ओबीसी समाज धनंजय मुंडे यांच्या मागे
ते म्हणाले की प्रकाश अण्णा शेंडगे तुमचे वडील फार मोठे माणूस होते. त्यांनी दुग्धविकास खात सांभाळताना त्यांनी राज्याला बरंच काही दिलं आहे. तुम्ही सुद्धा लोकसभा निवडणुकीला उभे राहिला होता. तुम्हाला फक्त 8000 मते पडली. आणि तुम्ही म्हणता अख्खा ओबीसी समाज धनंजय मुंडे यांच्या मागे आहे, अशा शब्दात त्यांनी प्रकाश शेंडगे यांच्या भूमिकेवरून टोला लगावला.
धस यांनी यावेळी बोलताना काही उदाहरणे सुद्धा दिली. ते म्हणाले की राम शिंदे यांच्या विरोधात रोहित पवार तेराशे मतांनी निवडून आले, मग राम शिंदे यांना मराठा मते मिळाली नाहीत का? नारायण आबा पाटील यांना फक्त धनगर मतांनी निवडून आले का? कोणता जातिवाद, ओबीसी वाद आणता? अशी विचारणा सुरेश धस यांनी केली. कोणत्याही समाजातील असेल, वडार समाजाचे असेल, कैकाडीची हत्या जरी झाली असती आम्ही तेवढ्याच ताकतीने बोललो असतो, असं सुरेश धस यावेळी म्हणाले. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असून आम्ही सगळे एकत्र असल्याचे सुरेश धस यांनी यावेळी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या