(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Chiplun Ratnagiri News : चिपळूण तालुक्यातील कुंभार्लीत हिंदू-मुस्लिम ऐक्य, आई महाकाली देवीचा यात्रोत्सवाला उत्सवात सुरुवात
Maharashtra Chiplun Ratnagiri News : हाकेला धावणारी व नवसाला पावणारी आई असे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. महाशिवरात्री पासून यात्रोत्सवाला सुरुवात होते.
Maharashtra Chiplun Ratnagiri News : विविध परंपरेने नटलेले कोकण... कोकणात पारंपारिक रिती, परंपरा आजवरही कोकणकरांनी जपून ठेवल्या आहेत. कोकणातील गावागावांतील ग्रामदैवताचा साजरा होणारा यात्रोत्सव लोकप्रिय आहे. कोकणात यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यातीलच एक म्हणजे चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली येथील आई महाकालीचा यात्रोत्सव... हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून या ग्रामदैवतेच्या यात्रोत्सवाकडे पाहिले जाते.
महाराष्ट्रात देवालयांचा विचार केलास थोड्या अंतरावर ग्रामदैवता म्हणजे शक्तीदेवतांचा वास दिसून येतो आणि त्यांच्या समोर भाविक नतमस्तक होतो. कुंभार्ली येथील शिरगाव, कुंभार्ली, पोपळी या तीन गावचे श्री सुखाही, वरदायिनी, महाकाली देवस्थान. हाकेला धावणारी व नवसाला पावणारी आई असे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. महाशिवरात्री पासून यात्रोत्सवाला सुरुवात होते.
शिरगांव, कुंभार्ली, पोफळी या तीन गावातील मानकरी मंदिराच्या चौथाऱ्यात बसून या उत्सवाचे नियोजन करतात. या यात्रेचे विशेष म्हणजे मंदिरासमोर असलेल्या मोकळ्या परीसरात एका उंच, सरळ लांब लचक खांबावर (बगाडावर) आडवी फिरणारी लाट... ही लाट फिरण्याअगोदर मंदिराच्या चौथाऱ्यात तीन गावातील मानकरी बसून पानाचे विडे मांडतात त्यानंतर त्याची विधीवत पूजा केली जाते.
मानकऱ्यांनी विडे मांडल्यानंतर लाट फिरणाऱ्या मानकऱ्याला घेऊन मंदिरात ढोल-ताश्यांच्या गजरात धूपारती हातात घेउन पाच प्रदक्षिणा मारल्या जातात. पाचव्या प्रदक्षिणेला मंदिरासमोरील मोकळ्या परिसरात उभारलेल्या बगाडाजवळ येतात. मग लाट फिरवण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. या लाटेच्या एका बाजूला मानकरी आणि दुसऱ्या बाजूला गावकरी असतात. त्यानंतर पाच गोल फेऱ्या मारल्या जातात आणि देवीला आरज लावला जातो..
तीन गावांच्या ग्रामदैवतेचे वैशिष्ट्य म्हणजे परंपरेनुसार शिरगांवकडे मोठ्या भावाची तर कुंभार्ली,पोफळी यांच्याकडे धाकट्या भावाची भूमिका आहे. या तीन गावचे देवस्थान सुखाई, वरदायिनी, महाकाली या साऱ्यांना एकत्रित ठेवणारी ताकद आहे. येथील संस्कृती हिंदू, मुस्लिम आणि सर्व धर्मियांना एकत्र ठेवणारी आहे. तीन गावातील मानकरी एकत्रित येऊन हा उत्सव गुण्यागोविंदाने पार पाडतात. यामध्ये पोफळी येथील रहिवाशी मुस्लिम धर्माचे सय्यद यांना परंपरेनुसार मान दिला जातो. म्हणून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते
या यात्रोत्सवासाठी हजारो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आईच्या दर्शनासाठी येतात. आईची खणानारळाने ओटी भरतात. या यात्रोत्सवानंतर आजूबाजूच्या गावातील ग्रामदैवतेच्या यात्रोत्सव सुरु होतात. कोकणात अशाच प्रकारचे यात्रोत्सव पुढील काही दिवस पाहायला मिळणार आहे.
इतर महत्तवाच्या बातम्या :