कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासातही विघ्न; रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे स्थानकांवर गर्दी, कोकणवासीय संतप्त
चिपळूणच्या सावर्डे स्थानकावर मुंबई, पुण्याकडे परतण्यासाठी लोकांची चांगलीच लगबग सुरू आहे. गणपती स्पेशल ट्रेन्स उशिरानं धावत असल्यानं रेल्वे स्थानकांवर बरीच गर्दी पाहायला मिळतंय.
रत्नागिरी : पाच दिवसांच्या गौरी गणपतीचे विसर्जन (Ganesh Visarjan) करुन कोकणवासीय परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. मात्र परतीच्या प्रवासातही रेल्वेच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय. परतीच्या प्रवासासाठी कोकण कन्या, गणपती स्पेशल, तुतारी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना सर्वाधीक पसंती असते. मात्र गणपती स्पेशल रेल्वे गाडी चार तास, तर तुतारी एक्सप्रेस दीड तास उशीरा धावत आहेत.त्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे. तसेच फ्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर वर येणारी गाडी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आल्याने झुंबड उडाल्याचं दिसून आलं. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांचं योग्य नियोजन करावे अशी मागणी कोकणवासीय करतायत.
चिपळूणच्या सावर्डे स्थानकावर मुंबई, पुण्याकडे परतण्य़ासाठी लोकांची चांगलीच लगबग सुरू आहे. गणपती स्पेशल ट्रेन्स उशिरानं धावत असल्यानं रेल्वे स्थानकांवर बरीच गर्दी होतेय. यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकर आणि पुणेकर रेकॉर्ड ब्रेक संख्येनं कोकणात गेले होते. त्यामुळे जाताना आणि येताना दोन्ही वेळेला ट्रेन्स फुल्ल आहेत. चाकरमानी हे कोकणातील ग्रामीण भागात आलेले जास्त पाहायला मिळतात. पाच दिवसांच्या गौरी- गणपतींचे शनिवारी विसर्जन करण्यात आले. सोमवारी कामावर पोहचण्यासाठी रविवारी सकाळपासूनच रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
रेल्वे स्थानकावर पोलिस तैनात
रेल्वे स्थानकांवरील गर्दी पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आरपीएफचे जवान, स्थानिक पोलिस, होमगार्ड तैनात करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावर ट्रेन आल्यानंतर धक्काबुक्की किंवा चेंगराचेंगरी होऊ नये याचाी काळजी घेण्यात आली आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखतर व्हावा यासाठी पोलिस तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत मात्र त्या देखील दोन ते तीन तास उशीराने धावत आहे. ज्यांच्याकडे बुकिंग नाही असे चाकरमानी उभे राहून किंवा दरवाजाजवळ बसून प्रवास करताना पाहायला मिळत आहे
सीएनजी पंपांवर देखील रांगा
पाच दिवसांच्या पाहुणचारानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. बाप्पासह गौरींचंही विसर्जन करण्यात आलं . काही मुंबईकर चाकरमानी खासगी वाहनांमधून गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले आहेत. बहुसंख्य वाहने सीएनजीवर चालतात. त्यामुळे चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच सीएनजी पंपांवर वाहन चालकांना पंपाच्या बाहेर रांगा लावून प्रतीक्षा करावी लागत आहे.
हे ही वाचा :