Uddhav Thackeray Mahad Rally: मी रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसूत उतरेल; उद्धव ठाकरेंकडून थेट आव्हान
भूमिपुत्रांवर काठ्या चालवताय, प्रकल्प चांगला आहे, तर लाठ्या कशाला? जनतेत जाऊन का सांगत नाही? तडीपारी, जिल्हाबंदी लावताय लोकांना विश्वासात का घेतल जात नाही? अशी विचारणा त्यांनी केली.
Uddhav Thackeray Mahad Rally: मी बारसूला गेलो होतो, त्यांच्याकडून माझ पत्र फडकवलं जात आहे. हो मी ते दिलं आहे कारण मला खोटं बोलता येत नाही. बारसूत उपऱ्यांची भर झाली आहे. मधाचं बोट लावून सोन्यासारख्या जमीनी घेतल्या, नाणारला रिफायनरी होणार नाही हाकलून दिली. त्यानंतर दिल्लीतून फोन आले, विनवण्या करण्यात आल्या, ओसाड जमिनी आहेत, दिल्लीतून फोन आला म्हणून पत्र दिलं. त्यामुळे सहमती आल्यानंतर सरकार पाडलं असेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला. महाडमध्ये जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी जाहीर आव्हान दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी पत्र दिल्यानंतर लोकांची सहमती असेल, तरच प्रकल्प होईल असे सांगितले होते. अन्यथा गेट आऊट असे सांगितले होते. सगळं पोलिस दल बारसूत उतरले आहे. घराघरात पोलिस घुसले आहेत. बाथरुममध्येही बंदोबस्त असेल. एवढा बंदोबस्त चीनला लावता असता, तर घुसखोरी झाली नसती. भूमिपुत्रांवर काठ्या चालवताय, प्रकल्प चांगला आहे, तर लाठ्या कशाला? जनतेत जाऊन का सांगत नाही, प्रकल्प चांगला आहे म्हणून? तडीपारी, जिल्हाबंदी लावताय लोकांना विश्वासात का घेतल जात नाही? अशी विचारणा त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, फटाके सुद्धा शिवसैनिकासारखे, पेटले की ऐकत नाही. मैदानातील फटाके बुडाखाली वाजल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपने नीच डाव केला. आपल्याच लोकांनी पाठीत वार केला. धनुष्यबाण चोरला, पक्षाचं नाव चोरलं. केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव घेऊन आपल्यासमोर आलो आहे तरी मैदान कमी पडत आहे. महाड आपला आहे, तो केवळ निवडणुकीसाठी नाही. हा गड आहे, भगव्याला कलंक लावायची हिंमत केल्यास गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही.
महाडचा आमदार शिवसेना ठाकरे गटाचाच होणार
दुसरीकडे, पक्षप्रवेशानंतर स्नेहल जगताप म्हणाल्या की, वडिलांच्या हात धरून राजकारणात आले. कोरोना कालखंडात उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुख म्हणून भूमिका बजावली. धारावीचा अभ्यास जगाने केला. याच कोरोनाने माझे वडिल गेले. त्यांनी 26 जुलै 2021 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. महाडने पूर अनुभवला. अण्णा कामाचा आढावा घेत होते, सूचना देत होते. महापुरानंतर आम्ही शहर पुन्हा उभा केले.महाडने खूप प्रेम दिलं आहे, माझ्या कुटुंबाला प्रेम दिलं आहे. त्यामुळे मी उभी आहे. या मतदारसंघातून शिवसेना आमदार सहावेळा निवडून आला आहे. या मतदारसंघात केवळ शिवसेना ठाकरे गटाचाच आमदार होईल, टाकाऊ आहे ते टाकून द्यायचं आहे, वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आपल्याला अभिप्रेत असलेली शिवसेना उभी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.