Tamhini Ghat Thar Accident : ताम्हिणी घाटातील थार अपघातातील मृतांची संख्या वाढली, अपघातात थारमधील 6 तरुणांचा मृत्यू
Thar Accident : रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात झालेल्या थार अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

रायगड : रायगडच्या ताम्हिणी घाटात थार अपघातातील सहा तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व तरुण 21 ते 22 वयोगटातील आहेत. अजूनही या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेकडून ही मृतदेह बाहेर काढले जात असून पोलीस देखील या बचाव कार्यात योग्य ती मदत करत आहेत. थार कार मधील सर्व 6 तरुणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. रेस्क्यू टीम कडून रोपच्या सहाय्याने या तरुणांचे मृतदेह अजूनही बाहेर काढले जात आहेत.हे सर्व तरुण पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवे कोपरे गावातील असल्याची माहिती समोर आली आहे.
Raigad Thar Accident Update : अपघातात थारमधील सर्व तरुणांचा मृत्यू
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ते 22 वयोगटातील सहा युवक थार गाडी घेऊन त्यांच्या घरातून 17 नोव्हेंबरला पर्यटनासाठी निघाले होते. रात्री दीड ते दोनच्या दरम्यान वाहन अपघात अनिंयत्रित होऊन दरीत कोसळल्यानं अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतं. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सहा जणांचे मृतदेह शोधण्यात आले आहेत. त्यापैकी एक मृतदेह रेस्क्यू टीमच्या मदतीनं बाहेर काढण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी माणगावला पाठवण्यात आला आहे. या बचावकार्यात तीन रेक्यू टीम कार्यरत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
अपघातातील तरुणांची नावे
1) साहिल गोठे (वय 24)
2) शिवा माने (वय 20)
3) प्रथम चव्हाण (वय 23)
4) श्री कोळी (वय 19)
5) ओमकार कोळी (वय 20)
6) पुनीत शेट्टी (वय 21)
सर्व राहणार पुणे जिह्यातील कोंडवे कोपरे गावातील आहेत.
फॉरेन्सिक टीमकडून अपघाताच्या कारणांचा शोध
रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटातील एका मुख्य वळणावर एक थार कार वेगात येवून 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर ताम्हिणी घाटातील या अपघातग्रस्त स्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली. अपघाताचे मूळ कारण आणि अपघात स्थळावरून हवेत गेलेली थार 500 फूट खोल दरीत किती वेगात कोसळली असावी, याचा तपास घेण्यासाठी फॉरेन्सिक टीमचे अधिकारी घटनास्थळावर दाखल. झालेत कोसळलेल्या थार कारच्या वेगात लोखंडी बॅरिगेट्स आणि येथील लोखंडी खांबाचे तुकडे होऊन पडलेत त्यामुळे या कारचा वेग प्रचंड वेगात असावा असा अंदाज व्यक्त होतोय.























