रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन,कर्जतमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक
Ramdas Kadam Vs BJP : रामदास कदमांनी बेताल वक्तव्यं बंद करावीत अन्यथा रायगडमधील शिंदे गटाच्या तीनही जागांवर उमेदवार उभे करू असा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला.
रायगड : कोकणात भाजप नेते रवींद्र चव्हाण आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचं दिसून येतंय. रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून कर्जतमध्ये रामदास कदमांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. रामदास कदम यांनी बेताल वक्तव्य बंद करावं नाहीतर त्यांना परिणाम भोगावा लागेल असा इशाराही भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून महायुतीमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर आता भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे. कर्जतमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांचा निषेध करत जोडे मारो आंदोलन केले आहे.
रायगडमध्ये विरोधात उमेदवार उभारण्याचा इशारा
भाजपने लोकसभेत प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म पाळत काम केले. मात्र अशा प्रकारे आमच्या नेत्यांवर बेताल वक्तव्य कराल तर रायगडमधील शिंदे गटाच्या तीनही जागांवर भाजपचा उमेदवार उभा करू असा इशारा देत भाजपने दंड थोपटले आहे.
दरम्यान, रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील भांडणामुळे महायुतीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून युतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम गेले अनेक वर्षे सुरूच आहे. आजवर हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. अशात खुद्द केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या महामार्गाची पाहणी करून रस्ता लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र तरीही त्यांनी देखील संसदेत या रस्त्यावरून हात जोडले.
दुसरीकडे, राज्याच्या विधानसभेत या महामार्गावरून चेष्टा करण्यात आल्याची बाब घडली होती. आता सागरी मार्गाचा आग्रह धरत मुंबई गोवा महामार्ग केला जात आहे. असे असले तरी या नव्या रस्त्याचा कोकणी माणसाला फायदा नाही. तर कोकणच्या विकासाची लाइफलाईन असलेला मुंबई गोवा महामार्ग हा दुर्लक्षित राहिला असल्याच एकंदर चित्र आहे. अशात आता याच महामार्गाच्या रखडपट्टीवरून राजकीय खरडपट्टीला उत आला असल्याचं चित्र आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून शिवसेने शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांना कुचकामी मंत्री म्हटलं. यासह त्यांनी त्यांच्या राजीनाम्याचीही थेट मागणी केली. प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी संपला, मात्र मुंबई- गोवा महामार्गावरील आमचा रस्त्याचा वनवास अद्याप संपत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या मार्गाची अवस्था खूप वाईट आहे. नुसते पाहणी दौरे कशासाठी करायचे, असा सवाल करत रामदास कदमांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली.
ही बातमी वाचा: