Karjat Khalapur : सुनील तटकरे नासका कांदा, महेंद्र थोरवेंच्या वक्तव्याचा अनिकेत तटकरेंकडून समाचार; म्हणाले, त्यांनी जरा...
Karjat Khalapur Assembly Constituency : शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकर यांच्यावर टीका केल्यानंतर रायगडमधील महायुतीचा वाद चव्हाट्यावर आला आहे.
रायगड : महेंद्र थोरवे यांना प्रत्युत्तर देण्याइतके ते मोठे नाहीत, त्यांनी आत्मचिंतन करावं अशी प्रतिक्रिया अनिकेत तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा युतीधर्म पाळणार असून महायुतीचं काम करणार असल्याचंही अनिकेत तटकरे म्हणाले. कर्जत खालापूरचे शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांची तुलना नासका कांद्याशी केली होती. त्यावर अनिकेत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
सुनिल तटकरे हे महायुतीतील नासका कांदा आहेत, त्यांना वेळीच फेकून द्या. अन्यथा महायुती खराब होईल अशी टीका महेंद्र थोरवे यांनी केली होती. त्यामुळे रायगडातील कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय.
महेंद्र थोरवेंनी आत्मचिंतन करावं
अनिकेत तटकरे म्हणाले की, महेंद्र थोरवे यांनी आत्मचिंतन करावे. कुठल्या एका व्यक्तीमुळे महायुतीत फूट पडणार नाही. कर्जत खालापूर मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. कर्जत हा मावळ लोकसभा मतदारसंघात येतो. महायुतीचे श्रीरंग बारणे इतर मतदारसंघात प्लसमध्ये होते. मग महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात असे काय झाले की ते 18 हजार मतांनी मागे गेले. त्यामुळे महेंद्र थोरवे यांनी त्याचे जास्त आत्मचिंतन करावे. महेंद्र थोरवे यांना उत्तर देण्याइतके ते मोठे नाहीत.
कोणाचा डीएनए कसा आहे याची तपासणी करायची असेल तर मी तयार आहे असंही अनिकेत तटकरे म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा महायुतीचं काम करेल. लोकसभेला तटकरे साहेबांच्या वेळी जेवढं काम केलं होतं त्यापेक्षा अधिक काम पेण, अलिबाग, महाडमध्ये आम्ही करू. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा महायुतीचा धर्म पाळणार असंही अनिकेत तटकरे म्हणाले.
कर्जत-खालापूरमध्ये तिरंगी लढत
कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार आहे. महेंद्र थोरवे हे शिवसेना शिंदे गटातून तर ठाकरे गटाचे नितीन सावंत हे महाविकास आघाडीतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला आहे.
ही बातमी वाचा: