(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Vidhan Sabha Candidates : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार ठरला, कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातून नितिन सावंत लढणार
Karjat-Khalapur Assembly Constituency : कर्जत-खालापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. शिवसेना उबाठा गटाचे नितीन सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
रायगड : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुती (Mahayuti) अशी लढत पाहायला मिळणार आहे. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चा सुरु आहेत. आता कर्जत-खालापूर मतदारसंघात (Karjat-Khalapur Assembly Constituency) महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. शिवसेना उबाठा गटाचे नितीन सावंत (Nitin Sawant) यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) विरूद्ध नितीन सावंत असा सामना रंगण्याची शक्यता आहे. नितीन सावंत यांची उमेदवारी जाहीर होताच ठाकरे गटाने जल्लोष केला.
कर्जत खालापूर मतदार संघात विद्यमान शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरुद्ध लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून सध्या कोणाला उमेदवारी मिळणार ही चर्चा रंगली होती. महाविकास आघाडीकडून डॉक्टर सुनील पाटील आणि नितीन सावंत यांची नावे चर्चेत असताना अखेर नितीन सावंत यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी लढत होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत नितीन सावंत?
नितीन सावंत हे कर्जत नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक आहेत. शिवाय ते उत्तर रायगडचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुद्धा आहेत. नगरपरिषदेची निवडणूक लढवून नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी राजकारणात स्वतःला सक्रिय केलं. शिवसेना पक्ष फुटीनंतर कर्जत खालापूर मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बळ देण्याचं काम त्यांनी केलं. पक्षाला नवसंजीवनी देऊन त्यांनी पक्षाची ताकद वाढविली. मागील लोकसभेला उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना 18 हजार मतांचं लीड त्यांनी मिळवून दिलं. अनेक रोजगार मेळावे घेऊन तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. महिलांसाठी पैठणीचा खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन त्यांनी केले आहे. विधानसभेतील ग्रामपंचायतींवर जास्तीत जास्त संख्येने शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाचा झेंडा त्यांना फडकवला आहे.
ठाकरे गटाचे 15 उमेदवार ठरले?
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची काल मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान आमदारांना मार्गदर्शन केले. ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या विद्यमान आमदारांमधील बहुतांश आमदारांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 15 विद्यमान आमदार या बैठकीला उपस्थित होते. यादी जाहीर होण्याची वाट बघू नका, तुमच्याबाबतीत ती सर्व औपचारिकता आहे, असे म्हणत विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 22 ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचनाही या उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा