(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : पत्नीचा गळा चिरून केला खून, पती स्वतः चंदननगर पोलीस ठाण्यात हजर, पोलिसही चक्रावले...
शहरातील एका 45 वर्षीय व्यक्तीने कुटुंबातील वादातून पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे : शहरातील एका 45 वर्षीय व्यक्तीने कुटुंबातील वादातून पत्नीची हत्या करून (Pune crime) पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लक्ष्मी केशव सीताफळे (वय 40, रा. लेबर कॅम्प खराडी) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशव भीमराव सीताफळे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या पत्नीशी वाद झाले आणि त्यानंतर त्याने धारदार चाकूने तिचा गळा चिरला आणि नंतर खुनाची माहिती देण्यासाठी स्वत: पोलिसात हजर झाला.
घटनास्थळी पोहचलेल्या पोलीस पथकाला ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्यानंतर याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मागील अनेक दिवसांपासून वाद...
केशव भीमराव सीताफळे आणि त्यांच्या पत्नीत मागील अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. घरातील अनेक कारणांवरुन वाद सुरु असायचे. यावेळीही असाच वाद झाला आणि दोघांमधील वाद टोकाला गेला. याच वादातून पतीने थेट पत्नीवर हल्ला केला यात पत्नीचा मृत्यू झाला. मात्र हे सगळं इथे थांबलं नाही तर केशवने स्वत: पोलीस स्टेशन गाठलं आणि स्वत:च पत्नीचा खून केल्याची माहिती दिली.
पोलिसही चक्रावले...
आतापर्यंत आपल्यातील प्रत्येकाने गुन्हेगार गुन्हा करुन पळून गेल्याचं किंवा लपून बसल्याचं पाहिलं आहे. अशी एखादी घटना घडली की पोलिसही गुन्हेगाराला शोधण्यासाठी प्रयत्न करतात. आरोपीला शोधणं पोलिसांसमोर मोठं आव्हान असतं. मात्र या प्रकरणात आरोपीने पत्नीची हत्या करुन थेट स्वत:ला पोलिसांच्या हवाले केल्याने काही वेळ पोलिसही चक्रावले होते.
पुण्यात गुन्हेगारीत वाढ
पुण्यात मागील काही दिवसांपासून बाकी गुन्ह्यांसोबतच किरकोळ वादातून हाणामारीच्या आणि लुटमारीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांवर आळा घालणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. पुण्यातील अनेक परिसरात गुन्हेगारांची धुमाकूळ घातला आहे. किरोकोळ कारणावरुन हाणामारी, पूर्ववैमस्यातून हत्येच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यातच रोज पुण्यातील वर्दळीच्या परिसरातून लुटमारीच्या घटनांनी पुणेकर त्रस्त असल्याचं चित्र आहे. मागील काही महिन्यापासून पुण्यात कोयता गँग सक्रिय आहे. पुण्यातील विविध परिसरांमध्ये त्यांनी दहशत निर्माण केली आहे. त्यांच्यातील अनेकांवर आतापर्यंत कारवाई झाली आहे. मात्र या टोळीतील लोक अजूनही पुण्यातील रस्त्यांवर दहशत निर्माण करताना दिसत आहे. या सगळ्या घटनांमुळे शांतताप्रिय अशी पुण्याची ओळख पुसली जात आहे.
हेही वाचा