विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाला अटक
चित्र काढलं नाही या क्षुल्लक कारणावरून संदीप गाडे या शिक्षकाने प्रसन्न पाटीलला मारहाण केली होती. या मारहाणीमुळे प्रसन्नच्या शरीराचा उजवा भाग लुळा पडला आहे, तसेच चेहरा वाकडा झाला. त्यामुळे त्याला नीट बोलणंही अवघड बनलं आहे.

पुणे : श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल अर्थात एसएसपीएमएस या शाळेतील शिक्षकाने सहावीच्या विद्यार्थ्याला चित्रकलेची वही अपुर्ण राहीली म्हणून बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी शिक्षक संदीप गाडेला पोलिसांनी आज अटक केली आहे.
चित्र काढलं नाही, या क्षुल्लक कारणावरून संदीप गाडे या शिक्षकाने प्रसन्न पाटील या विद्यार्थ्याला मारहाण केली होती. या मारहाणीमुळे प्रसन्नच्या शरीराचा उजवा भाग लुळा पडला आहे, तसेच चेहरा वाकडा झाला. त्यामुळे त्याला नीट बोलणंही अवघड बनलं आहे.
शिक्षकाने केलेल्या मारहाणीविरोधात प्रसन्नच्या पालकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांना संदीप गाडेला मारहाणीच्या आरोपाखाली अटक केली आहे.
शिक्षक संदीप गाडे यांनी विद्यार्थ्यांना दोन चित्रे काढून आणण्यास सांगितली होती. मात्र प्रसन्न पाटीलने चित्रे काढली नव्हती. त्यामुळे चिडलेल्या संदीप गाडे या शिक्षकाने प्रसन्नला बेंचवर हात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर प्रसन्नला चेहऱ्यावर आणि पोटात मारहाण केली होती. मारहाणीमुळे प्रसन्नला गंभीर इजा झाली. प्रसन्नवर बारामतीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रसन्नच्या पालकांनी हा सगळा प्रकार शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने संदीप गाडे याला तातडीने निलंबित केलं होतं. संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येईल, असं आश्वासनही मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी दिलं होतं.























