Swarajya Sanghatna Sambhaji Raje Chatrapati : स्वराज्य संघटना 2024 मध्ये महाराष्ट्रात निवडणूक लढवणार; संभाजीराजे छत्रपतींची घोषणा
महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य संघटना 2024 मध्ये महाराष्ट्रात निवडणूक लढवणार, असं वक्तव्य स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.
Swarajya Sanghatna Sambhaji Raje Chatrapati : महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य संघटना 2024 मध्ये महाराष्ट्रात निवडणूक लढवणार, असं वक्तव्य स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. ते आज पुण्यात अधिवेशनात बोलत होते. 2024 ची निवडणूक स्वराज्य संघटना महाराष्ट्रात लढणार असून सर्वांनी तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
ते म्हणाले की , सध्या राजकारणाची पातळी घसरली आहे त्याचबरोबर नेत्यांची ही पातळी घसरली आहे त्यांना सत्तेचा माज चढलेला आहे राजकारणातील सुसंस्कृतपणा संपला आहे. खोके बोके यावर फक्त चर्चा केली जाते संतांची महापुरुषांची नावे घेतली जातात. पण आपला महाराष्ट्र तसा राहिला आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. 2024 ची निवडणूक स्वराज्य पक्ष महाराष्ट्रात लढणार असून सर्वांनी तयारीला लागावे असे आवाहन करून ते म्हणाले की महाराष्ट्रातील गडकिल्ले ही छत्रपती शिवाजी महाराजांचा ठेवा आहे त्याचे संवर्धन होण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
स्वराज्य संघटनेचं पहिलं महाअधिवेशन पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं. या अधिवेशनात हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाचे सरचिटणीस डॉ धनंजय जाधव, उपाध्यक्ष रघुनाथ चित्रे पाटील, राजेंद्र कोंढरे, श्रीमंत कोकाटे, संयोगीताराजे, शहाजीराजे, माधव देवसरकर, विनोद साबळे, करणं गायकर,अंकुश कदम, फत्तेसिंग सावंत आदी उपस्थित होते.
'सामान्य कष्टकरी, शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी आपल्याला बाहेर पडायचंय'
ते पुढे बोलताना म्हणाले की, निवडून आल्यानंतर नेते आपला रंग दाखवतात. आता रेटून खोटे बोलले जात आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. वेळप्रसंगी ही मंडळी शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, महासंताचे नाव घेतात. मात्र जनतेचा खेळखंडोबा करणे सुरूच ठेवतात. आपल्याला वेड्यात कढाले जाते. आता पाच वर्षे वाट पाहण्याची गरज नाही. आजही वेळ गेली नाही. या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून जनजागृती करू, सामान्य कष्टकरी, शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी आपल्याला बाहेर पडायचे आहे. 2024 मधील निवडणुकींच्या तयारीला लागा, असाही सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
'सरकारकडे मास्टर प्लॅन नाही'
पुणे संवेदनशील शहर आहे या स्वराज्याच्या अधिवेशनातील ठिणगी पडली, वणवा पेटायला वेळ लागणार नाही. सध्या राज्यातून उद्योग बाहेर जात आहेत. सगळ्यात जास्त टॅक्स आपला राज्य भरतो. सगळे मोठे उद्योगपती आपल्या राज्यातले आहेत.तरी सगळे उद्योग राज्याच्या बाहेर चालले आहेत ही शोकांतिका आहे. सरकारकडे मास्टर प्लॅन नाही. सगळे उद्योग बंद पडले आहेत. या सरकारकडे योग्य नियोजन नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.