Sushma Andhare : देवेंद्र फडणवीसांनीच भाजपमधील बडे नेते संपवलेत, त्यामुळे आता दुसरीकडचे नेते आयात करावे लागतायत; सुषमा अंधारेंची बोचरी टीका
Sushama Andhare : भाजपकडे स्वतःचे नेते शिल्लक राहिले नाहीत. फडणवीस यांनी भाजपचे नेते संपवले आहेत. म्हणून त्यांना दुसरे नेते घ्यावे लागत आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
Sushma Andhare : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यात दिल्लीत बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मनसे आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती होणार, अशी चर्चा आता रंगली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. तसेच राज ठाकरेंनाही त्यांनी टोला लगावला आहे.
आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा करण्यात आली.
वंचितने आमच्या सोबत यावे
त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत माझ्या यात्रे दरम्यान ज्या काही अडचणी जाणवल्या आहेत, त्याबद्दल पवार साहेबांना सांगायला आले होते.बीड लोकसभेबाबत बोलण झालं तसे इतर काही लोकसभा मतदासंघाबाबत चर्चा करण्यात आली आहे. वंचितने आमच्या सोबत यावे. भाजप पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे. म्हणून वंचितने आमच्यासोबत यावं, असं वाटते. कल्याणबाबत लवकरच जागा जाहीर होतील, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. पवार साहेब कुठेही निवडणुकीला उभे राहिले तरी निवडून येतील. पवार साहेब यांनी पुण्यातून उभ राहावं,पण उभे राहायचे की नाही? हा निर्णय तेच घेऊ शकतात, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
फडणवीसांनी भाजपचे नेते संपवलेत
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीवरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, भाजपकडे स्वतः चे असे नेते शिल्लक राहिले नाहीत. फडणवीस यांनी भाजपचे नेते संपवले आहेत. म्हणून त्यांना दुसरे नेते घ्यावे लागत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मोदी-शाह मुंबईत यायचे
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मोदी-शाह मुंबईत येत होते. आता यांना दिल्लीला जावे लागत आहे, असा टोला त्यांनी यावेळी राज ठाकरेंना लगावला आहे. आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत, लोकसभा जागाहून कुवत ठरवावी का? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे दौरे सुरू आहेत. फुटीरतावादी शिवसेनेला जास्त जागा मिळणार नाहीत. उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.