Suresh Kalmadi : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांच्या ताफ्यावर चप्पल फेकून मारली अन्... आजही सांगितल्या जातात आठवणी
Suresh Kalmadi: पुण्यातील टिळक रोडवरील टिळक स्मारकाजवळ पंतप्रधानांच्या ताफ्यावर चप्पल फेकण्यात आली होती.

Suresh Kalmadi Passed Away: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi Passed Away) यांचे आज (6 जानेवारी) पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. सुरेश कलमाडी यांचे पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानी अंत्यदर्शनसाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर कलमाडी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (Suresh Kalmadi Death)केले जातील. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा दबदबा फार मोठा होता. पुण्याच्या राजकारणात कलमाडी यांना मानणारा वर्ग देखील मोठा होता. सुरेश कलमाडी अनेक वर्षे पुण्याचे खासदार राहिले. एक मोठा काळ कलमाडी यांची पुण्याच्या राजकारणावर पकड राहिली होती. त्यांचे राजकीय काळातील अनेक किस्से आजही मोठ्या चर्चेत असतात, त्यातीलच एक किस्सा म्हणजे सुरेश कलमाडी यांनी पंतप्रधानांवर पुण्यात चप्पल फेकून मारली होती. या घटनेमुळे पुण्यात चांगलाच गोंधळ झाला होता. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं वाचा सविस्तर.
जनता सरकारमध्ये मोरारजी देसाई त्यावळचे पंतप्रधान बनले
तो काळ होता आणीबाणीनंतरच्या जनता सरकारचा.... सुरेश कलमाडींनी त्यावेळी मंत्री असलेले शरद पवार यांच्यामुळे राजकारणामध्ये एंट्री केली होती. त्यानंतर ते पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. पुढे काँग्रेस सरकारला उतरती कळा लागल्यानंतर जनता सरकारमध्ये मोरारजी देसाई त्यावळचे पंतप्रधान बनले होते. आणीबाणीच्या काळामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि दडपशाहीवरून जनता सरकारने इंदिरा गांधी आणि संजय गांधींच्या विरोधात हल्लाबोल करण्यास सुरूवात केली होती.
टिळक स्मारकाजवळ कलमाडींनी पंतप्रधान देसाईंवर चप्पल फेकून मारली
तर दुसरीकडे मोरारजी देसाई यांनी बदल्याची भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात होता. काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर त्यावेळी देसाई देखील होते. याच दरम्यानच्या काळात मोरारजी देसाईंचा पुणे दौरा ठरलेला होता. त्यावेळी सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वात देसाईंच्या विरोधात पुण्यामध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं. पंतप्रधान मोरारजी देसाई पुण्यात पोहोचले, त्यांचा दौरा टिळक रोडवरून जात असतानाच टिळक स्मारकाजवळ सुरेश कलमाडींनी पंतप्रधान देसाईंवर चप्पल फेकून मारली आणि घटनास्थळी एकच गोंधळ निर्माण झाला. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. वेगवेगळ्या बातम्या झापल्या आणि ही बातमी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली.
सुरेश कलमाडी यांनी थेट पंतप्रधानांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याची बातमी संजय गांधी यांच्यापर्यंत पोहचली होती. प्रकरण वाढलं, याची चांगलीच चर्चा झाली पण सरकार पडल्यानंतर पक्षातील उतरत्या काळातही कलमाडींच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठींकडून कौतुक झालं.
पंतप्रधांनांच्या ताफ्यावर चप्पल फेकून मारण्याची घटना ही त्यांच्यासाठी राजकारणातील करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट ठरली. पुढे त्यांना पक्षात बढती मिळत गेली, मात्र,याच काळात जेव्हा शरद पवार काँग्रेस पक्षातून बाहेर पडले, त्यांनी आपला पक्ष स्थापन केला त्यावेळी कलमाडीही बाहेर पडले होते. पण ते परत स्वगृही परतले आणि काँग्रेस पक्षात आपली नवी ओळख निर्माण केली. पुढे त्यांना मंत्रीपदही मिळालं. अनेक वर्षे खासदारही राहिले.
पुण्याच्या राजकारणातील खिलाडी म्हणून ओळखले जाणारे कलमाडी पुढे कॉमनवेल्थ गेमच्या घोटाळ्यात अडकले आणि त्यांच्या राजकारणाला ग्रहण लागलं. त्यांना याप्रकरणी जेलची हवा खावी लागली.























