Ajit Pawar: 600 मीटर रस्त्यासाठी सुप्रिया सुळेंचे 7 तास आंदोलन, अजितदादांनी लगावला टोला; म्हणाले, खासदार निधीतून...
Ajit Pawar: एका मिनिटात त्या रस्ता करण्यासंबंधी निर्णय घेऊ शकतात, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

पुणे: पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचं चित्र आहे. या रस्त्यासाठी काल (बुधवारी, ता-9) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भर उन्हातही उपोषण केलं. पाच वाजण्याच्या सुमारास सुळेंचं हे उपोषण मागे घेण्यात आलं, यावरून पुण्यात असताना उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पाच कोटींचा खासदार निधी मिळतो. रस्ता करायचा म्हटलं तर या निधीतून करता येतो. एका मिनिटात त्या रस्ता करण्यासंबंधी निर्णय घेऊ शकतात, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भोर येथील बनेश्वरच्या सहाशे मीटर रस्त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल(बुधवारी, ता-9) रोजी उपोषण केलं आहे. यावर पिंपरीत पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, भोरमधील बनेश्वरचा रास्ता केवळ सहाशे मीटर आहे. आमदार शंकर मांडेकर यांनी बनेश्वरच्या रस्त्याचा प्रश्न मांडला आहे. मी इथला पालकमंत्री आहे. रस्ता सहाशे मीटरचा आहे. फार मोठा नाही. हा रस्ता पीएमआरडीए, जिल्हा परिषद किंवा जिल्हा वार्षिकी योजनेमधून तो रस्ता करण्यात येणार आहे. सुप्रिया सुळेंची ही स्टंटबाजी आहे का? असा प्रश्न विचारला असता पवार यांनी 'नो कॉमेंट्स' असं म्हणत केवळ सहाशे खासदारांना पाच कोटींचा निधी मिळतो. रस्ता करायचा म्हटले तर या निधीतून करता येतो. त्या एका मिनिटात रस्ता करण्यासंबंधी निर्णय घेऊ शकतात', असा टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
तो रस्ता फक्त 600 मीटरचा रस्ता आहे. देवगिरी बंगल्यावर मंगळवारी बैठक होते. त्यावेळी शंकर मांडेकरने माझ्याकडे हा विषय मांडला. अवघ्या 600 मीटरच्या रस्त्याबाबत हे सुरु आहे. मांडेकर स्थानिक आमदार आहे, मी त्याला सांगितलं आहे. मुळात मागच्या आमदाराने त्याकडे लक्ष दिलं नाही. मी त्याला निधी देऊन, लवकरच काम सुरू करतो. हे मी कालच सांगितलं होतं. 2 तारखेला नव्हे तर ताबडतोब काम सुरू करतोय अन तो मी पूर्ण करेन. सुप्रिया सुळे स्टंटबाजी करतायेत का मग? त्यावरची नो कमेंट्स, मी 35 वर्षे काम करतोय. आमदार अन खासदारांना 5 कोटींचा निधी मिळतो. काम करायचं म्हटलं तर एका मिनिटांत करता आलं असतं, असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यावर सुळे म्हणाल्या...
आज बारामतीत सुप्रिया सुळे अजित पवारांच्या या वक्तव्यावर बोलताना म्हणाल्या, त्यांचं म्हणणं योग्य आहे. आमदाराला पाच कोटी आणि खासदाराला पण पाच कोटी. आमदाराचे साडेतीन ते चार लाख मतदार असतात एका खासदाराला 23 लाख मतदार असतात.
सत्तेतल्या आणि विरोधातल्या कोणत्याच खासदाराला निधी पुरत नाही, असं सुळेंनी स्पष्ट केलं आहे.

























