Manikrao Kokate: तेव्हाच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय; कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले?
Manikrao Kokate: कर्जमाफीबाबतचा निर्णय थोडा मागे- पुढे होईल, आर्थिक स्थिती बरी झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर चार- सहा महिन्यांत निर्णय घेतील, असं वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे.
पुणे: लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती ताण आला असल्याची कबुली राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होईल, असं आश्वासन देखील कोकाटे यांनी दिलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय सहकार विभागाकडे येतो, कृषी खात्याकडे नाही. परंतु, यावर माहिती मागविण्याचे काम सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर थोडा बोजा पडला आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगलीही नाही, वाईटही नाही. त्यामुळे कर्जमाफीबाबतचा निर्णय थोडा मागे- पुढे होईल, आर्थिक स्थिती बरी झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर चार- सहा महिन्यांत निर्णय घेतील, असं वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे.साखर संकुलमध्ये शनिवारी (दि.4) आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान काल पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, नियमाप्रमाणे दोन योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळं तो निर्णय महिलांनी घ्यायचा आहे. त्यांनी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा ते त्यांनी ठरवायचं. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा. हे त्यांनी ठरवायचं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिला शेती कामाला येत नसल्यानं मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर बोलतांना कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, सर्वच कामांसाठी लाडक्या बहिणींवर का अवलंबून राहावं.
बहिणींना दोन्हीपैकी एक लाभ घेता येईल
नमो महासन्मानमध्ये पैसे दिले जातात. लाडक्या बहिणींमध्येही लाभ दिला जात आहे. एका वेळी दोन ठिकाणी लाभ घेता येत नाही. त्यामुळे महिलांनी निर्णय घ्यायचा आहे. लाडकी बहिणमध्ये लाभ घ्यायचा की पंतप्रधान सन्मान निधीमध्ये घ्यायचा हे त्यांनी ठरवायचे. तर 2029 च्या निवडणुकीपूर्वी लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिला आरक्षणाचे विधेयक येणार असल्याचेही कोकाटे म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवरतीही केलं मोठं भाष्य
मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत, त्याबाबत बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ नाराज असल्याचे म्हणत असतील, तरी मला तसं काही वाटत नाही. पक्षाने छगन भुजबळ यांचे पुष्कळ लाड केले असून, अजून किती लाड करायचे? असा सवाल देखील राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित केला आहे. जो जे वांच्छिल ते तो लाभो. त्यांना कुठे जायचे तिकडे जाऊ द्यात. माझे नेते अजित पवार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. माझे दुसरे कोणीही नेते नसल्याचे कोकाटे यांनी म्हटलं आहे.