Santosh Deshmukh Case : मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीत झालेल्या मोर्चातून सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.
मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ (Santosh Deshmukh Case) शनिवारी परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाचे (Parbhani Muk Morcha) आयोजन करण्यात आले होते. या मोर्चातील सभेतून भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. सुरेश धस यांनी अजित पवार यांना घेरताच राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत. मग गृह खातं झोपा काढत आहे का? असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी विचारला आहे.
सुरज चव्हाण यांनी 'एक्स' पोस्ट शेअर करत सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आ. सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. परभणीच्या सभेत अजितदादांना क्या हुआ तेरा वादा... म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश अण्णाला माझा प्रश्न आहे. आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत. मग गृह खातं झोपा काढत आहे का? निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? स्व. संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जरी नेता, कार्यकर्ता जर चौकशीत दोषी आढळला तर अजितदादा त्यांच्यावर कार्यवाही करायला गय करणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आ.सुरेश अण्णा धस जाणीव पूर्वक राजकारण करत आहेत.परभणीच्या सभेत अजित दादांना क्या हुआ तेरा वादा ...म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश अण्णा ला माझा प्रश्न आहे आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत मग गृह खातं झोपा काढत आहे का ? निष्पक्ष चौकशी…
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) January 5, 2025
अजितदादांना बदमान करण्याचं काम केलं तर...
तसेच सुरज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत इशारा देखील दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे. आ. सुरेश अण्णा धस यांना आवरावे. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम ते करत आहेत. विनाकारण अजितदादांना या प्रकरणात बदमान करण्याचं काम केलं तर जशास तस उत्तर आम्ही देऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
श्री @Dev_Fadnavis जी आपल्या पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 5, 2025
अमोल मिटकरींचा फडणवीसांना सवाल
दरम्यान, सुरेश धस यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. अमोल मिटकरी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलंय की, देवेंद्र फडणवीसजी आपल्या पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी काल परभणी मधील मूक मोर्चात 'क्या हुआ तेरा वादा अजितदादा', अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार? की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा