(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अंतरिम जामिनावर असलेले स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेना पुन्हा न्यायालयीन कोठडी
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे आणि तीन कर्मचारी 18 ऑगस्टला एसीबीच्या जाळ्यात फसले आणि शहरात एकच खळबळ उडाली.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीचे उर्वरित पंधरा सदस्य ही आता एसीबीच्या रडारवर आहेत. कारण एसीबीने आज पुणे सत्र न्यायालयात 'त्या' सोळा व्यक्ती म्हणजे स्थायी समितीचे सदस्य असल्याचं आणि वेळ पडल्यास त्यांच्याकडे चौकशी करायची असल्याचं म्हटलंय. त्यामुळे भाजपनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अपेक्षांची ही गोची होण्याची दाट शक्यता आहे. अशातच अंतरिम जामिन मिळाल्याने बाहेर असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगेची रवानगी पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे आणि तीन कर्मचारी 18 ऑगस्टला एसीबीच्या जाळ्यात फसले. अन शहरात एकच खळबळ उडाली. जाहिरातदार व्यावसायिक असणाऱ्या तक्रारदाराकडे त्यांनी तीन टक्क्यानुसार दहा लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती दोन टक्क्यानुसार सहा लाखांचा सौदा ठरला होता. यातील पहिली रक्कम स्वीकारताना एसीबीने हा छापा टाकला. पाच जणांना अटक झाली अन दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पण चौकशी दरम्यान घेतलेली लाच सोळा व्यक्तींना द्यावी लागते, असं पिंगळेंनी तक्रारदाराशी साधलेल्या संवादाचा पुरावा एसीबीच्या हाती लागला.
गेल्या शनिवारी हाच आधार घेऊन पुढच्या चौकशीसाठी न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ करून दिली होती. मात्र चौकशीत पिंगळेंनी ते सोळा जण कोण? याबाबतची माहिती दिली नाही. तेंव्हा लांडगेना 26 ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला. तर पिंगळेसह चौघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. आज लांडगे न्यायालयात हजर झाले, त्यावेळी मात्र एसीबीने हे सोळा स्थायी समितीचे सदस्य असल्याचं न्यायालयात म्हटलं. अन सर्वांचे धाबे दणाणले. अध्यक्ष लांडगेची चौकशी आधीच सुरू आहे. त्यामुळं आता स्थायी समितीचे उर्वरित पंधरा सदस्य एसीबीच्या रडारवर आलेत. त्यांना कधी ही चौकशीला बोलावलं जाऊ शकतं. यात भाजपचे नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार शिवसेनेचा एक तर भाजप संलग्न अपक्ष एक अशा पंधरा नगरसेवकांचा समावेश आहे.
भाजप नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेना एसीबीने अटक केल्यानंतर विरोधकांनी आंदोलनाचा सपाटा लावला. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला धरून भाजपला घेरण्याचा जणू डावच आखला. पण एसीबीने न्यायालयात ते सोळा जण म्हणजे स्थायी समितीचे सदस्य असल्याचं म्हटल्याने आता विरोधकांची देखील गोची झालीये. कारण एसीबीने या सर्वांना चौकशीला बोलावलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बोलती बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या अंतरिम जामिनावर बाहेर आलेल्या नितीन लांडगेची पुणे सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा न्यालालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे. आता पुढील चौकशीत या यादीत उर्वरित पंधरा सदस्यांपैकी कोणाची भर पडते का? आणि तो सदस्य कोणत्या पक्षाचा असेल? याबाबत शहरात तर्क-वितर्काना उधाण आलंय.
संबंधित बातम्या :
स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेंसह पाच जण ताब्यात, एसीबीच्या कारवाईने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ, सत्ताधारी भाजप अडचणीत?