(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar On NCP Political Crisis : शिवसेना आणि राष्ट्रवादी ही भाजपसमोरील मोठी आव्हानं, भाजप पक्ष फोडेल याचा अंदाज होता : रोहित पवार
"भाजपने ज्यापद्धतीने शिवसेना फोडली तसा प्रयत्न राष्ट्रवादीच्या बाबतीत होईल, असा अंदाज होतो," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली.
Rohit Pawar On NCP Maharashtra Crisis : "शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपसमोरील सर्वात मोठी आव्हानं होती. त्यामुळे भाजपने ज्यापद्धतीने शिवसेना फोडली तसा प्रयत्न राष्ट्रवादीच्या बाबतीत होईल, असा अंदाज होतो," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली. तसंच अजितदादांच्या बाबतीत व्यक्तिगत भावनिक आहे. राजकारण बाजूला ठेवलं तर नक्कीच मी भावनिक झालो आहे," असंही रोहित पवार म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
'राजकारण गलिच्छ झालंय'
रोहित पवार म्हणाले की, "काल घडलं आणि वर्षभरात महाराष्ट्रात घडत आहे ते पाहून मतदारांचं म्हणणं आहे की राजकारण गलिच्छ झालं आहे. मत देऊन चूक केली आहे की असं वाटू लागलं आहे. केवळ मतदारच नाही तर ध्येय घेऊन,विचार घेऊन राजकारणात आलेल्या आमच्यासारख्यांनाही वाटतं की राजकारणात येऊन चूक केली का? कारण लोकांच्या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा अनेक जण स्वत:बद्दल, स्वत:ची खुर्ची कशी टिकवता येईल, स्वत:ची उद्दिष्टे कशी पूर्ण करता येतील यात गुंतले आहेत. हे पाहून राजकारण करायचं की नाही असाही विचार मनात येतो. महाराष्ट्राच्या मनामध्ये लढणं लिहिलं आहे. हा विचार पुढे नेत शरद पवारांनी सामान्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. सामान्य लोकांचे नेते कसे असतात हे यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्याकडे पाहून कळतं. आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते अशाच लोकांकडून प्रेरणा घेत असतात.
पवारसाहेबांनी आमदारांची, सर्वांची भूमिका मांडली आहे. 5 जुलैला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलावली आहे, असंही रोहित पवार यांनी सांगितलं.
'भाजप पक्ष फोडेल याचा अंदाज होता'
"अजित पवार जातील याचा अंदाज कोणाला नव्हता. पण भाजप पक्ष फोडेल याचा काही प्रमाणात अंदाज होता. भाजपने ज्यापद्धतीने शिवसेना फोडली, असा प्रयत्न राष्ट्रवादीच्या बाबतीत होईल असा अंदाज होता. नजीकच्या काळात लोकनेते कोण असा विचार केला तर बाळासाहेबांचा उल्लेख केल्याशिवाय राहता येत नाही तसंच शरद पवारांचाही उल्लेख झाल्याशिवाय राहणार नाही. लोकनेत्यांनी सुरु केलेला पक्ष जसे की शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्रात भाजपला एकहाती सत्ता आणण्यापासून रोखू शकतात हे भाजपला माहित असावं," असं रोहित पवार पुढे म्हणाले.
'अजितदादांनी अनेक वेळा मदत केलीय'
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, "अजितदादांच्या व्यक्तिगत भावनिक आहे. ते माझे काका आहेत. त्यांनी अनेक वेळा त्यांनी मला मदत केली आहे. व्यक्तिगत जीवनातही मदत केली आहे. त्यामुळे काकांबद्दल बोलत असताना, राजकारण बाजूला ठेवलं तर नक्कीच मी भावनिक झालो आहे. शेवटी तो राजकारणाचा भाग आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं आहे."
हेही वाचा