Amol Kolhe Vs AJit Pawar : अमोल कोल्हेंनी कोणतेही प्रश्न मार्गी लावले नाहीत, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या; अजित पवारांचा हल्लाबोल
शिरुरमधील समोरचा उमेदवार हा कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकला नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असं म्हणत त्यांनी अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केला आहे.
उरुळी कांचन, पुणे : विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर आपल्याला शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करावे. समोरचा उमेदवार हा कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकला नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Adhalrao Patil) यांच्या प्रचारार्थ अजित पवार (Ajit pawar) यांच्या उपस्थितीत उरुळी कांचन येथे जाहीर सभा झाली. यावेळी अजित पवार बोलत होते.
सत्तेतून प्रश्न मार्गी लागतात म्हणून आम्ही सरकारमध्ये गेलो आहोत. मी कामाचा माणूस आहे. एक घाव दोन तुकडे करणारा व्यक्ती आहे. उरळी कांचन करांनो समोरच्या व्यक्तींला खासदार की मध्ये काहिच रस नाही. त्यामुळे आपल्यासाठी कामाची असणारी व्यक्ती म्हणजे आढळराव पाटील आहेत, त्यांना विजयी करा. थेऊर कारखाना सुरु करणे, उपबाजार, ट्रँफिक असे सर्व प्रश्न आपण मार्गी लावू, असंही ते म्हणाले.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मला 33 वर्षे झाली 91 साली मला खासदार म्हणून निवडून दिले होते. तसा आपला जुना संबंध आहे. ही निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातात द्यायची. देश कोण योग्य दिशेने घेऊन जाईल याबाबतची आहे. कोणाच्या विचाराचा खासदार दिल्लीमध्ये निवडून पाठवायचा आहे याबाबतची ही निवडणूक आहे. मागील काळातील 2004, 2009 आणि 2014 अशा निवडणुकांमध्ये आम्ही अनेकदा आढळराव पाटील यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला परंतू आढळराव पाटील यांचा शेवटच्या मतदारासोबत असलेला कनेक्ट, सामाजिक काम, डाऊन टू अर्थ राहण्याची त्यांची पद्धत यामुळे ते आम्हाला शक्य होत नव्हते.
पुढे बोलताना ते म्हणाले, 2019 ची निवडणूक लागली अनेकांचा आम्ही शिरुर लोकसभेसाठी विचार करत होतो पण कोणीच तयार होईना. मग आम्ही मागील वेळी धनंजय मुंडे यांच्या घरी बसलो असताना आम्ही आमोल कोल्हे यांना फोन करुन बोलावून घेतले. आम्ही त्यांना म्हटले तुम्ही शिरुर लोकसभेतूान निवडणूक लढवा. ते म्हणाले मी शिवसेनेत आहे. लोकसभेचा मला काहीच अनुभव नाही, परंतू मी त्यांना सगळं आम्ही पाहतो म्हटलो, आणि आम्ही त्यांना उभे केले. महिला आणि तरुण वर्गांने त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केल्यामुळे डोक्यावर घेतले. याच कारणास्तव ते निवडून आले. परत एक, दोन वर्षांत हा माणूस माझ्याकडे येऊन म्हणतो राजीनामा द्यायचा आहे. मला माझ्या अभिनय क्षेत्राला वेळ देता येत नाही म्हणाले. मी समजावून सांगितले आणि राजीनामा देण्यापासून थांबवले. या व्यक्तीने कुठलेही विकासाचे प्रश्न मार्गी लावले नाही. मतदारसंघात पिरकलेही नाहीत. आता मात्र या मतदार संघातील पाणी, ट्र्रँफिक, कारखाना सुरु करणे हे सर्व प्रश्न आम्ही नरेंद्र मोदी, अमित शहा , एकनाथ शिंदे , देवेंद्रजी फडणवीस सगळे मिळून हे प्रश्न सोडवू. विकासाचे सर्व प्रश्न तडीस नेऊ. उरुळी कांचन आमि मतदार संघातील सर्व प्रश्न सोडवू त्यासाठी आपण सर्वांनी येत्या 13 तारखेला आढळराव पाटील यांच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा."
इतर महत्वाची बातमी-