Sharad Pawar, Ajit Pawar : निवडणुकीच्या तोंडावर साहेब आणि दादांसाठी मिले सुर मेरा तुम्हारा! अजितदादांच्या आमदारांच्या मनात चाललंय तरी काय?
साहेब आणि दादांनी एकत्र यावं अशीच भावना या आमदारांच्या बोलण्यातून व्यक्त होत असल्याने आगामी विधानसभेच्या तोंडावर काही चमत्कार तर होणार नाही ना? अशीही चर्चा रंगली आहे.
Sharad Pawar, Ajit Pawar : राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटून दोन शकले झाले असली, तरी एकत्र येण्याची चर्चा काही थांबलेली नाही. सातत्याने शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून होत असतानाच आता थेट आमदारांमधून सुद्धा होऊ लागल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून विशेष करून अजित पवारांच्या आमदारांचा मात्र वेगळाच स्वर दिसून येत आहे. साहेब आणि दादांनी एकत्र यावं अशीच भावना या आमदारांच्या बोलण्यातून व्यक्त होत असल्याने आगामी विधानसभेच्या तोंडावर काही चमत्कार तर होणार नाही ना? अशीही चर्चा रंगली आहे.
साहेब आणि दादा एकत्र आल्यास आम्हाला नक्कीच आनंद
विशेष करून पुण्यामधील अजितदादा गटाच्या तीन आमदारांनी जाहीरपणे शरद पवार आणि दादांनी एकत्र यावं असं बोलत आहेत. यामध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेनके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांचा समावेश आहे. या तिन्ही आमदारांनी एकत्र यावं, अशी भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आमदार सुनील शेळके यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास आनंदच असल्याचे म्हटले आहे. मात्र, हे स्वप्न एक महत्त्वकांक्षी नेता पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणत रोख नेमका कोणाकडे आहे अशीही चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी सुनील शेळके आणि अतुल बेलके यांनी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे अशी भावना व्यक्त केली होती. साहेब आणि दादा एकत्र आल्यास आम्हाला नक्कीच आनंद होईल असेही आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे.
अतुल बेनके शरद पवारांच्या भेटीला
काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यानंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार बेनके यांनी सहा महिने तटस्थ होते. मात्र, नंतर त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. परंतु, लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात अजित पवारांना धक्का बसला होता. बेनके यांच्या जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनी मताधिक्य घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर आता अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांकडे जात असल्याची चर्चा आहे.
अण्णा बनसोडेंकडून अतुल बेनकेंच्या सूरात सूर
दुसरीकडे, राजकारणात कधी आणि काहीही होऊ शकतं असं अतुल बेनके यांनी म्हटलं होतं. साहेब आणि अजित दादा एकत्र आले तर मला आनंद होईल. मी दादांकडे तशी मागणी ही करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. असं अजित पवार (Ajit Pawar) गटातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही अतुल बेनके यांच्या विधानचं समर्थन केलं आहे.
शरद पवारांच्या खासदाराला अजित पवारांच्या आमदाराने निवडून आणलं!
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या खासदाराला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराने निवडून आणलं आहे. पुण्यात आई एकविरा देवीच्या ट्रस्टवर भिवंडीचे शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रेंची वर्णी लागावी, यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके मैदानात उतरले होते. या निवडणुकीत एकूण सात सदस्यांमधील शेळकेंच्या पाच समर्थकांनी म्हात्रेंना मतदान केलं. त्यामुळे सात शून्य अशा फरकाने म्हात्रे निवडून आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं गेलं. स्वतः शेळके निवडणूक प्रक्रियेवेळी तिथं ठाण मांडून होते, त्यांनीही याची कबुली दिली. आम्ही स्वतंत्र पक्षात असलो तरी आमचं प्रेम वेगळं आहे. त्यांना मी दिलेला शब्द पाळला, असं म्हणत निर्माण होणाऱ्या चर्चांवर शेळकेंनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं म्हात्रेंनी शेळकेंचे आभार मानले.
अजित पवार पुन्हा परत येणार का? काय म्हणाले होते शरद पवार
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलताना जोरदार राजकीय टोलेबाजी केली होती. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार पुन्हा परत येणार का? याबाबत बोलताना प्रतिक्रिया दिली होती. निवडणुका येतात आणि जातात. कुटुंब कायम राहतं. ते पुढे म्हणाले की, घरामध्ये सगळ्यांना जागा आहे. मात्र, पक्षांमध्ये जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळामध्ये मजबुतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेन आणि ती तयार झाली तर असे म्हणत त्यांनी हा निर्णय एकट्याचा होणार नसल्याचे स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या