Pune Crime News: जीवन संपवण्याआधी मैत्रिणीला पाठवली ऑडिओ क्लिप पण....3 तासांनी मिळेल अशी केली सेटींग, नंतर 15 व्या मजल्यावरून उडी, नेमकं काय घडलं?
Pune Crime News: आत्महत्येच्या तीन तासानंतर जवळच्या मैत्रिणीला सहिताच्या मोबाईलवरून 42 मिनिटांची ऑडिओ क्लिप आली.

पुणे: पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून पंधराव्या मजल्यावरून उडी घेतली आणि या घटनेनं पिंपरी चिंचवड शहर हादरलं. आपलं जीवन संपवण्याआधी तिने आपल्या मैत्रिणीला पाठवलेल्या 42 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमधून तिच्या या निर्णयामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. तब्बल 37 दिवसांच्या तपासानंतर अखेर वाकड पोलिसांनी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहे. सहिती रेड्डी असं या तरूणीचं नाव होतं. तिने 5 जानेवारीला ताथवडे येथील राहत्या इमारतीवरून उडी मारली होती. तिचा मित्र आणि प्रियकर प्रणव डोंगरेने शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळं तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे, तिने आत्महत्या करण्यापुर्वी ही क्लीप आपल्या मैत्रीणीला मिळेल अशी सोय करून ठेवली होती.
तरूणीला तिचा प्रियकर प्रणव त्रास देत असल्याचं, वेळोवेळी मानसिक छळ करत असल्याचं तिनं सांगितलं होतं. आता आपण आपलं नातं थांबवूयात, असं म्हणत तो तिला टॉर्चर करत होता. प्रणवचा शारीरिक आणि मानसिक छळ सहन होत नव्हता. म्हणून मी आता माझं आयुष्य संपवत आहे. अशा आशयाची ऑडिओ क्लिप बनवत सहिताने ती तिच्या जवळच्या मैत्रिणीला पाठवली. त्यामध्ये तिने स्वतःचा मोबाईल राहत्या इमारतीच्या टेरेसवर कुठं लपवून ठेवला आहे आणि त्याचा पासवर्ड काय आहे? हे सुद्धा पाठवलं होतं. फक्त ही ऑडिओ क्लिप पाठवल्यानंतर तीन तासाने मैत्रिणीला पोहचेल, अशी सेटिंग करुन ठेवली होती. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील घरातून सहिती बाहेर पडली आणि तिने खाली उडी घेऊन जीवन संपवलं.
नेमकं काय आहे प्रकरण?
सहिती रेड्डी असं आत्महत्या केलेल्या तरूणीचं नाव आहे. सहिती ही आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. त्यावेळी तिची आणि प्रणवची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं, आणि त्याच्याकडून होणाऱ्या शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने आपलं जीवन संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी प्रणव राजेंद्र डोंगरे याला अटक केली आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुण्यातील ताथवडे या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी (वय 54) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिली माहिती
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी सहितीने आत्महत्या केली होती. त्यावेळी तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली होती. मात्र, पोलिसांना पुरावा म्हणून सहिती हिने तिच्या मोबाईलमध्ये अनेक रेकॉर्डिंग आणि मेसेज पाठवले आहेत. याशिवाय तिने तिच्या काही जवळच्या मित्रांना देखील शेअर केले होते. त्यात तिने स्वतःचा मोबाईल कुठे ठेवला आहे आणि याचा पासवर्ड देखील सांगितला होता. यामुळे सर्व हकिकत समोर आली आहे. या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला.
























