Rupali Chakankar: सुप्रिया सुळेंनी बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेल्या जागेची पाहणी करताच रुपाली चाकणकरांचा पारा चढला, म्हणाल्या...
Rupali Chakankar on Supriya Sule: रुपाली चाकणकर यांनी संबंधित घटना घडून पाच दिवस झाले, पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले असं म्हणत सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.
पुणे: पुण्याजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात एका 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती, अद्याप या घटनेतील आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. मात्र, या घटनेने नागरिकांनी, राजकीय नेत्यांनी, अभिनय क्षेत्रातील व्यक्तींनी देखील प्रतिक्रिया दिली होती, या घटनेतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं काम करत आहेत, अशातच या घटनास्थळाला काल(मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र प्रवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी बोपदेव घाट परिसरात झालेल्या घटनास्थळी पाहणी केली, त्यानंतर पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी पुण्यासह राज्यात घडत असलेल्या घटनांबाबत रोष व्यक्त केला आहे, यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी संबंधित घटना घडून पाच दिवस झाले, पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले असं म्हणत सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.
काय म्हणाल्या रूपाली चाकणकर?
बोरदेव घाटात घडलेल्या संबंधित घटनेला घडून पाच दिवस झाले, पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले, मुळातच पोलिसांनी पहिल्या दिवसापासून 12 टिम तयार करून युद्धपातळीवर तपास करीत आहेत. मग आपला हा देखावा कशासाठी??? आपल्या माहितीसाठी,चंद्रपुरमध्ये कोरपना येथे 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा शिक्षक हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे, याविरोधात आंदोलन कधी करणार? आपल्या सोशल मिडियाच्या प्रदेश सरचिटणीसवर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनविणे ,पाठवणे, अश्लाघ्य कमेंट करणे यासाठी चार सायबर गुन्हे दाखल आहेत, पोलीस कोठडीही घेऊन आलेल्या या आरोपीला आपण नियुक्तीपत्र देता, नक्की कशाचे समर्थन करता? त्याच्याविरोधात आंदोलन कधी करणार? कालच नगरमध्ये भानुदास मुरकूटेंवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला, जे आपल्यासोबतचे पदाधिकारी आहेत,यांच्याविरोधात आंदोलन,पत्रकार परिषद कधी घेणार? झोपी गेलेल्याला जाग करता येत, पण झोपेचं सोंग घेणाऱ्यांना नाही, म्हणून आपल्या माहितीसाठी NCRB चा काल प्रकाशित झालेला अहवाल देत आहे, असं म्हणत रूपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे.
बोपदेव घाटात घडलेल्या घटनेवर सुळेंची प्रतिक्रिया
मंत्रालयात तडजोडी होत असल्याने गुन्हेगारांना वचक राहिलेला नाही. आठवड्यानंतरही बोपदेव घाट प्रकरणातील आरोपींना अटक झाली नाही. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढत असून, गृहमंत्री फडणवीस जबाबदार नाहीत का? प्राप्तिकर विभाग, ईडी तसेच सीबीआयचा वापर विरोधकांच्या अटकेसाठी केला जातो. मग याच यंत्रणांचा वापर बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी का होत नाही? पोलिसांची, वर्दीची भीती गुन्हेगारांना का राहिलेली नाही?’, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला होता.