Baramati Loksabha Election : सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांनंतर आता रिक्षाचालक शरद पवार बारामतीच्या रिंगणात; उमेदवारी अर्ज भरणार!
बारामतीत पवार विरुद्ध पवार लढाईत अजून एका पवारांची एंट्री झाली आहे. महत्वाचं म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) असं या तिसऱ्या पवारांचं नाव आहे.
पुणे : राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा (Baramati Loksabha Election )मतदारसंघात रोज नवे ट्विस्ट बघायला मिळत आहेत. आरोप प्रत्यारोप आणि पवार विरुद्ध पवार अशी लढाई पाहायला मिळते आहे. मात्र आता या पवार विरुद्ध पवार लढाईत (Pawar Vs pawar) अजून एका पवारांची एंट्री झाली आहे. महत्वाचं म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) असं या तिसऱ्या पवारांचं नाव आहे. बारामती लोकसभेत नणंद विरुद्ध भावजय अशी लढत आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर तिसरा उमेदवार आता शरद पवार असणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी बघतोय रिक्षावाला नावाच्या संघटनेनं चार उमेदवारांची घोषणा केलेली आहे. यातील एका उमेदवाराचं नाव शरद पवार असं आहे.
लोकसभा मतदारसंघासाठी बघतोय रिक्षावाला नावाच्या संघटनेनं आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात एका रिक्षाचालकाचं नाव शरद पवार आहे. त्यामुळे या रिक्षाचालकाची सध्या राज्यात चांगलीच चर्चा रंगत आहे. घटनेकडून उमेदवारांच्या प्रचारासाठी 18 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, एसबीआय बँकेजवळ, चर्च रोड परिसरात दुपारी 12 वाजता प्रचारसभा घेतली जाणार आहे. त्यानंतर हे सगळे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
व्यवसायातील गीग वर्कर्स यांच्या मागण्यांबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने गांभीर्य न दाखवल्यामुळे, आम्ही मतदानाद्वारे आमचे आंदोलन मतपेटीतून पुढे नेत असून, या चार लोकसभा मतदार संघातील, 4 लाख गिग वर्कर्स आणि त्यांचे 16 लाख कुटुंबीय आमच्याच उमेदवारांना मतदान करून आमची ताकद आम्ही राजकीय पक्षांना दाखवून देऊ, असा इशारा रिक्षावाला संघटनेने दिला आहे.
शरद पवार हे मुळचे बीडचे आहेत मात्र ते सध्या कात्रज- आंबेगाव परिसरात राहतात. सगळ्या प्रकारच्या कष्टकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचं ते म्हणाले. पुण्यात मागील काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी रिक्षा पर्मिटवर काम करणं गरजेचं आहे. अनेकांना रिक्षा पर्मिट दिलं जातं. त्यामुळे संख्या वाढते. यावर नियंत्रण आणणं महत्वाचं असल्याचं शरद पवार म्हणाले.
कोणाकोणाला उमेदवारी दिली?
बारामती- शरद पवार (रिक्षाचालक)
पुणे- मनोज वेताळ (टेम्पो चालक)
मावळ- संतोष वालगुडे (कॅब चालक)
शिरुर- स्वप्निल लोंढे (फूड डिलिव्हरी बॉय)
इतर महत्वाची बातमी-