(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News: वेताळ टेकडीवर घाणीचं साम्राज्य! कचराकुंडीत पाणी साचल्याने नागरिकांना करावा लागतोय डासांचा सामना
प्लास्टिकच्या बॉटल, प्लास्टिक जमा झालं आहे आणि त्यातच पावसाचं पाणी देखील साचल्याने डास आणि इतर किटकांनी कचराकुंडी व्यापली आहे.
Pune News: पुण्यातील पौड रोड परिसरात असलेल्या वेताळ टेकडीवर नागरिक डासांमुळे हैराण झाले आहेत. गेले अनेक दिवस पुण्यात मुसळधार पाऊस पडला त्यामुळे टेकडी बहरली आहे मात्र याच टेकडीवरील कचरा कुंडीत पावसाचं पाणी साठल्याने नागरिकांना सकाळी फिरायला जाताना डासांचा सामना करावा लागत आहे. वेताळ टेकडीवर ठिकठिकाणी सिमेंटच्या कचराकुंड्या ठेवल्या आहेत. त्यात प्लास्टिकच्या बॉटल, प्लास्टिक जमा झालं आहे आणि त्यातच पावसाचं पाणी देखील साचल्याने डास आणि इतर किटकांनी कचराकुंडी व्यापली आहे.
वेताळ टेकडीवर रोज शेकडो नागरिक सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जात असतात. टेकडीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आणि विविध जातींचे फुलं बघायला मिळतात. शिवाय मोर, घार यांंसारख्या पक्षांना बघायला देखील अनेक पुणेकर आवर्जुन जातात. मात्र याच टेकडीवरील डासांमुळे नागरिकांचं आरोग्याला धोका आहे. पावसाचं पाणी साठवून ठेऊ नका, साचलेल्या पाण्यापासून दूर रहा, पावसाळ्यात स्वच्छता राखा, असं आवाहन वारंवार पालिकेकडून करण्यात येतं. मात्र सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या पाण्याकडे पालिकेचं दुर्लक्ष होताना दिसत आहे.
'आम्ही रोज वेताळ टेकडीवर फिरायला येतो. वातावरण आणि सकाळ प्रफुल्लीत व्हावी आणि व्यायाम व्हावा यासाठी अनेक वर्ष झाले सातत्याने येत आहोत. या टेकडीचं सौंदर्य आणि फ्रेश हवा आम्हाला आकर्षित करते. मात्र काही दिवसांपासूव आम्हाला डासांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पाणी साचल्याने डासांचं प्रमाण वाढतं. साथीचे रोगंही वाढतात. त्यामुळे टेकडीवर स्वच्छता राखावी असं आवाहन पालिकेला आणि इथे येाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला करतो', असं मत पुणेकराने व्यक्त केलं आहे.
पुणे शहरात सध्या डेंग्यूच्या रुग्णांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. आरोग्याची काळजी घ्या, असंही सांगण्यात येत आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचं प्रमाण झपाट्याने वाढतं. आरोग्य विभागाने शेअर केलेल्या KRA रिपोर्टनुसार, या महिन्यात आतापर्यंत 86हून अधिक संशयित डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. केईएम रुग्णालयात अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर रुग्ण समोर आले आहेत.