Pune Breaking News LIVE Updates : येरवडा परिसरातील इमारत कोसळली; पाच जणांचा मृत्यू
स्लॅबसाठी तयार करण्यात आलेली लोखंडी जाळी अचानक निसटली आणि त्याखाली काम करणाऱ्या कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Background
दुर्घटनेतील मृत कामगारांना अजित पवार यांची श्रद्धांजली ; मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर
पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत
पुण्यातील दुर्घटनेतील मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
जखमींना तत्काळ उपचार, कुटुंबियांना मदतीचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने झालेल्या मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार मिळावेत तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत त्यांनी यंत्रणांना निर्देश दिले आहेत. इमारतींचे बांधकाम तसेच अन्य कामांच्या ठिकाणीही जीवितहानी होऊ नये, यासाठीच्या सुरक्षा उपाय योजनांची खबरदारी घेण्यात यावी. त्याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे.























